पाटणा कोयनानगर मार्गावर दोन एसटींची धडक

पाटण-कोयनानगर मार्गावरील तामकडे गावच्या हद्दीत धोकादायक वळणावर बुधवार  २१ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातामध्ये दोन्ही एसटी बसमधील एकूण ५६ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ७ गंभीर जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. दोन्ही बसची धडक एवढी भीषण होती की गाडय़ांची अवस्था पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडत होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाडय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचे ठिकाण कोयना नदीकाठावरील मार्ग हे आहे. नदीच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर संरक्षक कठडे असल्याने बस नदीपात्रात सुदैवाने गेल्या नाहीत. अन्यथा कोयना धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि कोयना नदीने घेतलेले रौद्ररूप पाहता महाडसारखी भयानक परिस्थिती उद्भवली असती.

दरम्यान, या अपघाताची नोंद पाटण पोलिसांत झाली असून, पाटणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली. तसेच अपघाताच्या चौकशीबाबत सूचना केल्या.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुहागर आगाराची गुहागर-पुणे ही (क्र.एम.एच.१४ बी.टी. ४१५९) पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते, तर रत्नागिरी आगाराची पुण्याहून रत्नागिरीकडे निघालेल्या पुणे-रत्नागिरी (क्र.एम.एच.२० बी.एल. ३६१७) या एशियाड बसमध्ये ३० प्रवासी होते. या दोन्ही बस गाडय़ा तामकडे गावच्या हद्दीतील पाटण नळपाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलसमोर असणाऱ्या धोकादायक वळणावर आल्या असता भरधाव वेगात असणाऱ्या दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही बस गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातामध्ये एसटीमधील स्नेहल जाधव (४०, कोयना), महादेव पाष्टे (३०), संजय पाष्टे (३२), पांडुरंग येले (४०), मधुकर पाष्टे (३०), संतोष संकपाळ (३५), मुकींदर कांबळे (२८), सुरेश बडे (५३), अरविंद नानीजकर (४५), इंदुबाई डोके (६०), मुरलीधर सोलकर (३५), सुशांत आर्गे (२५), सुनील पवार (४१), रामचंद्र घाणेकर (६०), प्रीती भोसले, प्रीती बारटक्के, आकाश भुवड, मनोहर भुवड (४५, सर्व रा. गुहागर), सुरेश चव्हाण (४७, चिपळूण पिंपळी), मनस्वी कदम (२३), वैशाली कदम (५९), स्वाती सांगळे (४५), सचिन जाधव (२४), देवेंद्र घाग (३९, सर्व रा. चिपळूण), तन्वी चव्हाण, सायली चव्हाण, ऋषीकेश राजशिर्के (१९), मनीषा राजेशिर्के (४८), रामकृष्ण शालगर (३३), सुधीर चव्हाण (५२, सर्व रा. सातारा), अशोक चव्हाण (३२), दिव्या चव्हाण व सुवर्णा चव्हाण (सर्व रा. वाई), रवींद्र बुटाल (५९), अब्बास गैबी (७२), जमील लांबे (७४), धोंडुबाई कुंभार (५७), सुजाता बुटाल (५७, सर्व रा. पुणे), पृथ्वीराज वाघमारे (३९), राजेंद्र बनकर (३५, सर्व रा. बारामती), उमेश पांडे (२०), अंजली मोरे (३६), अजित मोरे (४०, सर्व रा. पाटीलसडा), सुमित्रा बाजे (५५, तासवडे), किसन लाड (किसुर्डे), एसटी चालक उमेश शिवथारे (रत्नागिरी आगार, कळंबे), मधुरा जोशी (संगमेश्वर), रोहन साळवी (१५, महाड) अजित रेवडे हे प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींपैकी काहींना डोक्याला तर काहींना हाता-पायांना जखमा झाल्याने त्यांच्यावर पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर सोडण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयाची १०८ रुग्णवाहिका व शहरातील सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिका तसेच खाजगी वाहनातून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. जखमी प्रवासी तसेच मदत कार्यासाठी धावून आलेले सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकाऱ्यांच्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात एकच गर्दी झाली होती. वेदनेने व्याकूळ झालेल्या जखमींवर प्राथमिक उपचार करण्यापूर्वी जखमींना रुग्णालयामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते.

सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी हवाबंद पाण्याच्या बाटल्या तातडीने उपलब्ध करून दिल्या. रुग्णालयातील रुग्ण विभागात आधीच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या एकाच बेडवर चार-चार जखमींवर उपचार करावे लागले. अपघातात जोरदार मार लागलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या एक्सरे मशिनही उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे जखमी व त्यांच्या नातेवाईकांमधून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत होता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सी. के. यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये तातडीने उपचार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *