जम्मू-कश्मीरात उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन दिवस होत नाहीत तोच पाकड्यांनी पुन्हा मस्ती दाखवायला सुरुवात केली आहे. उरी आणि नौगाम येथे पाकिस्तानच्या १५ दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, पाकच्या सैन्याने सीमेवर शस्त्रसंधीची एैशीतैशी करीत उल्लंघन केले. हिंदुस्थानी चौक्यांवर गोळीबार केला. उरी येथे दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे १८ जवान शहीद झाले. रविवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यात ४ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या परिसरात आणखी दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला आहे. आज उरी आणि नौगाम येथे दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. उरी येथे रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. हिंदुस्थानी जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात असून किमान १० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दरम्यान, १५ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. पाच जणांचा शोध सुरू आहे. नौगाम येथे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. चकमकीत एक जवान शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. उरीसह सीमेलगतच्या अनेक भागांत जवानांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.