गेल्या काही दिवसांपासून मीरा-भाईंदरमधील डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सुमारे ६५० रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची खळबळजनक माहिती नगरसेवक आसिफ शेख यांनी दिली आहे. महापालिकेतील नोंदीनुसार आतापर्यंत चार रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.
पावसाळा संपत आला असतानाच आता मलेरिया व डेंग्यू या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असून यात बहुतांश मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आहेत, अशी माहिती शेख यांनी दिली. याशिवाय गेल्या दोन महिन्यात डेंग्यूमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची नोद पालिकेच्या दफ्तरी आहे. महापालिकेतर्फे करण्यात येणारी डास प्रतिबंधक उपाययोजना कुचकामी ठरत असून डासांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेकडून पूर्वी धूरफवारणी केली जात होती. परंतु या धुरामुळे डास मरत नसल्याने धूरफवारणी गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. फवारणी करण्यात येणाऱ्या औषधांच्या दर्जाबाबत शंका घेण्यास वाव असल्याने औषधे व ठेकेदार यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आसिफ शेख यांनी केली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने खासगी रुग्णालयांना भेटी देऊन डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांची माहिती घ्यावी, अशी मागणी आसिफ शेख यांनी केली आहे
