योगासनांच्या माध्यमातून घराघरात आणि नंतर जवळपास पाचशेच्या वर उत्पादनांच्या माध्यमातून सुपर मार्केटमध्ये जाऊन पोहोचलेले योगगुरू बाबा रामदेव आता आंतरराष्ट्रीय बाजारात जोरदार एन्ट्रीच्या तयारीत आहेत. त्यांनी जीन्स बनवण्याचा बेत जाहीर केला आणि माध्यमांत उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींच्या मते फक्त स्वदेशीच्या नार्याच्या जोरावर त्यांची उद्योग क्षेत्रातली घोडदौड कौतुकास्पद आहे तर काहींच्या मते त्यांची करनी आणि कथनी यात फरक आहे. नाव स्वदेशीचे आणि विकणार ब्लू जीन्स, जी अमेरिकन संस्कृतीचे प्रतीक आहे. एफएमसीजी म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुडस्. म्हणजे अशा वस्तू ज्या फार महाग नसतात आणि बाजारात पटापट विकल्या जातात. आपल्याला रोज लागणारा किराणा म्हणा की! या क्षेत्रात देशी-परदेशी कंपन्यांना अब्जावधींचा फायदा होतो. या क्षेत्रात फार विचारपूर्वक रामदेवबाबांनी मुसंडी मारली. त्यांना मानणारा एक फार मोठा वर्ग हिंदुस्थानात आहे. योगासनांमध्ये प्रावीण्य असलेल्या बाबांनी आपली विद्या घराघरात पोहोचवली, ज्याचा फायदा अनेकांना झाला. लोक त्यांना मानत असल्याने त्यांच्या उत्पादनांवरही लोकांचा विश्वास बसला. आज थोडीथोडकी नव्हे तर पाचशेच्या वर उत्पादनं पतंजली या ब्रँड नेमखाली रामदेवबाबांनी बाजारात आणली आहेत. ज्या मोठमोठ्या कंपन्यांनी सुरुवातीला पतंजलीला किरकोळ समजले, त्या कंपन्यांना पतंजली कडी टक्कर देत आहे. मॅगी वादाचा फार मोठा फटका नेस्लेला बसला, त्याच काळात बाबांनी परिस्थितीचा फायदा घेऊन देशी नूडल्स बाजारात आणले. मॅगी परतली, मॅगी प्रेमी परत मॅगी विकत घ्यायला लागले, पण पतंजलीचा नूडल्सच्या बाजारात प्रवेश झालाच. खरं तर रामदेवबाबा नागपुरात आले होते, नागपूर येथे ते सुरू करत असलेल्या प्रकल्पाबद्दलच्या कामासाठी, पण याच पत्रकार परिषदेत त्यांनी जीन्सच्या क्षेत्रात उडी मारायचा आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर केला. ‘परिधान’या नावाखाली जीन्ससह कपडा उद्योगात पतंजली उतरणार आहे.
पतंजली ब्लू जीन्स
