पेट्रोल आणि डिझेल पंप मालक तीन दिवस बंद पाळणार असल्याची अफवा सध्या पसरली असून त्यावर विश्वास ठेवू असे आवाहन अखिल भारतीय पेट्रोल वितरकांच्या संघटनेने म्हटले आहे.
‘ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स‘चे प्रवक्ते अली दारूवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘किंमतीमध्ये वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या वितरकांच्या नफ्यामध्ये वाढ करण्यात आली नसल्याने पेट्रोल पंप मालक तीन दिवस पेट्रोल पंप बंद ठेवणार असल्याची अफवा सध्या सोशल मिडियावर पसरली आहे. मात्र याबाबत संघटनेने कोणत्याही प्रकारचे निवेदन जाहीर केलेले नाही.‘ त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या महिन्यात दोन वेळा बदल झाला आहे. महिन्याच्या सुरूवातीला पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली होती. तर त्यानंतर पेट्रोलच्या दरात 58 पैशांची वाढ, तर डिझेलचे दर 31 पैशांनी कमी झाले आहेत.
