राज्याला दोन लाख डॉक्‍टरांची कमतरता

लोकसंख्येच्याप्रमाणानुसार नवीन मानांकनाच्या आधारे २५० लोकसंख्येमागे एक डॉक्‍टरची आवश्‍यकता आहे. प्रगत अमेरिकेत ३९० लोकसंख्येमागे एक डॉक्‍टर आहे. याचा विचार करता, महाराष्ट्राला २ लाखांहून अधिक डॉक्‍टरांची कमतरता आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने २०१७ ते २०२२ साठी तयार केलेल्या बृहत आराखड्यातून ही स्थिती पुढे आली आहे.
 
भारतामध्ये सध्यस्थितीत सतराशे लोकसंख्येसाठी एक डॉक्‍टर आहेत. महाराष्ट्रामध्ये हेच प्रमाण एक हजार ५४० लोकसंख्येचे आहे. पण एम. बी. बी. एस., दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी पदवीधरांचा विचार करता, राज्यात ४८१ लोकसंख्येमागे १ डॉक्‍टर असल्याचे दिसून येते. पाकिस्तान आणि मलेशियामध्ये प्रत्येकी चौदाशे, केनियामध्ये ७ हजार १००, अर्जेंटिनामध्ये ३३० लोकसंख्येमागे एक डॉक्‍टर उपलब्ध आहे. दरम्यान, राज्यात आरोग्य सेवेसाठी कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ उपलब्ध नसणे हे मोठे आव्हान आहे. हीच बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने जिल्ह्याच्या गरजेनुसार नवीन आरोग्य विज्ञानचे महाविद्यालय सुरु करण्याचे धोरण स्विकारण्यात आले आहे. त्यातल्या त्यात विभागातील अविकसित जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय गरीब आणि गरजूंना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून सरकार, महापालिका, असरकारी संस्थांच्या सहकार्यातून आरोग्य विज्ञानचे शिक्षण दिले जावे असे अपेक्षित आहे.
 
वैद्यकीय महाविद्यालयांची गरज
विद्यापीठाच्या आराखड्यात नमूद केल्यानुसार आरोग्य विज्ञानच्या विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये नसलेल्या जिल्ह्यांची संख्या अशी ः वैद्यकीय- १३, दंत- १६, आयुर्वेद- ७, युनानी- ३०, होमिओपॅथी- ९, नर्सिंग- ३, फिजिओथेअरपी- २०, ऑक्‍युपेशनल थेअरपी- ३३, बी. एल. एस. एल. पी.- ३२. या साऱ्या बाबी ध्यानात घेऊन विद्यापीठातर्फे नवीन महाविद्यालये आणि विद्यार्थी क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया ३१ ऑक्‍टोंबरपर्यंत चालणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या संस्था चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठात शुक्रवारी (ता. १६) सकाळी अकराला बैठक होत आहे. बैठकीत प्रस्ताव करण्यासंबंधीच्या सूचना, प्रस्तावासोबतच्या कागदपत्रांची माहिती दिली जाणार आहे. विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रम महाविद्यालयासाठी संबंधित केंद्रीय परिषद तथा विद्यापीठाच्या मानांकनानुसार लागणाऱ्या आवश्‍यक सोई-सुविधा आदींबाबत सांगितले जाणार आहे.
 
आरोग्य शिक्षणात राज्य दुसऱ्या स्थानी
आरोग्य शिक्षणामध्ये विविध अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांच्या संख्येच्या आधारे कर्नाटक अव्वलस्थानी आहे. कर्नाटकमध्ये ५५६ महाविद्यालये आहेत. ३६९ महाविद्यालये  असलेला महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. आंध्रप्रदेशात ३२१, तमिळनाडूमध्ये २८४, केरळमध्ये २४१, राजस्थानमध्ये २२८, मध्यप्रदेशात २०५, उत्तरप्रदेशात १३३ महाविद्यालये आहेत. कर्नाटकशी तुलना करावयाची झाल्यास महाराष्ट्रात वैद्यकीय होमिओपॅथीची महाविद्यालये अधिक आहेत. फिजिओथेअरपी, ऑक्‍युपेशनल थेअरपीच्या शिक्षणाची सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध आहे. देशामध्ये आरोग्य विज्ञानच्या महाविद्यालयांची एकुण संख्या ३ हजार ११५ इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *