दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका महिलेनं मुंबई पोलिसांची काल मध्यरात्री चांगलीच दमछाक केली. मध्यरात्री वांद्र्याच्या लीलावती हॉस्पिटलच्या परिसरात चेकींग सुरू असताना पोलिसांनी एका महिलेची गाडी अडवली. त्यावेळी संबंधित महिलेनं दारु पिल्याचं समोर आलं.
पोलिसांनी संबंधित महिलेला गाडीतून उतरण्यास सांगितलं. मात्र ही महिला गाडीतून उतरण्यास तयार नव्हती. त्याचवेळी अचानक या महिलेनं आपली गाडी रिव्हर्स गेरमध्ये पळवायला सुरुवात केली. पोलिसांनी कशीबशी ही गाडी पकडली. मात्र, या महिलेनं उतरण्यास नकार देत गाडीचे दरवाजे लॉक करुन घेतले.
पोलीस या महिलेला गाडीतून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. मात्र, ती पोलिसांना दाद देत नव्हती. तब्बल दोन तास ही महिला गाडीतच बसून होती. शिवाय या महिलेनं गाडीतला टेप मोठ्या आवाजात सुरु ठेवला आणि तब्बल अडीच तास धुम्रपान करत बसली. अखेर पोलिसांनी मागच्या दरवाजाची काच फोडून दरवाजा उघडला आणि या महिलेला बाहेर काढलं.
हा सर्व प्रकार सुमारे अडीच तास सुरु होता. बाहेर आल्यानंतरही ही महिला पोलिसांशी हुज्जत घालत होती. अखेर तिला ताब्यात घेण्यात आलं.

