मुंबईत कोंबडया कापणे बंद

मुंबईत कोंबडया कापणे बंद

मुंबईकरांना शेळ्या, मेंढय़ांचे चांगल्या दर्जाचे मांस मिळावे म्हणून देवनार पशुवधगृहातून पशुवैद्यकीय अधिका-यांकडून प्रमाणित करूनच हे मांस विक्रीला मुंबईत आणले जाते.

मात्र, मुंबईत कोंबडय़ांची कत्तल करून त्याचे मटण विक्री करताना त्या कोंबडय़ांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला होणारा धोका लक्षात घेऊन यापुढे कोंबडय़ांची तपासणी करून देवनार पशुवधगृहातच त्यांची कत्तल केली जावी आणि त्यांचे मटण मुंबईत विक्रीसाठी पाठवले जावे, अशी मागणी आता जोर धरू लागली असून त्या दृष्टिकोनातून महापालिकाही विचार करत आहे.

मुंबईत विक्रीसाठी येणा-या कोंबडय़ांची महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिका-यांमार्फत देवनार पशुवधगृहात तपासणी केल्यानंतर त्यांचे मटण वेगळे करून नंतरच मुंबईत पाठवण्यात यावे अशा प्रकारची मागणी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

मुंबईत दररोज राज्याच्या विविध भागांतून लाखो कोंबडय़ा विक्रीसाठी आणल्या जातात. मुंबईत येणा-या कोंबडय़ांची पशुवैद्यकीय अधिका-यांमार्फत कोणतीही चौकशी केली जात नाही. परिणामी ‘बर्ड-फ्लू’सारख्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती त्यांनी या ठरावाच्या सूचनेत म्हटली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी गल्लीबोळात कोंबडय़ांची दुकाने असून कोंबडय़ांचे मटण वेगळे केल्यानंतर निघणारी पिसे तसेच अन्य टाकाऊ अवयव गटार अथवा नाल्यात टाकले जातात. परंतु या कोंबडय़ांच्या पिसांचे प्लास्टिकप्रमाणे ब-याच कालावधीपर्यंत विघटन होत नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात विक्रीसाठी येणा-या सर्व कोंबडय़ांची पशुवैद्यकीय अधिका-यांमार्फत एकाच ठिकाणी म्हणजे देवनार पशुवधगृहात वैद्यकीय तपासणी केल्यास ‘बर्ड-फ्लू’सारख्या सांसर्गिक रोगांना आळा बसेल आणि कोंबडय़ांच्या पिसांपासून तसेच अवयवांपासून भुकटी तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होऊन कच-याचा प्रश्नही निकालात निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *