अमिताभ बच्चन यांनी जे. जे. रुग्णालयात झाडू मारला

महानायक अमिताभ यांनी शनिवारी चक्क हातामध्ये झाडून जे. जे. रुग्णालयाती परिसर स्वच्छ केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च तंत्र शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासह अनेक शासकीय अधिका-यांनीही हातात झाडू घेऊन परिसराची साफ सफाई केली.

राज्य शासनाचा नगररचना विभाग आणि एनडीटीव्हीच्या वतीने ‘महाक्लिनेथॉन’ मोहीम सुरू करण्यात येत असून त्याची सुरुवात जे. जे. रुग्णालयापासून करण्यात आली.

राज्यात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून त्याचा उद्घाटन सोहळा अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रत्यक्ष स्वच्छतेची मोहीम जे. जे. रुग्णालयापासून सुरू करण्यात आली.

उद्घाटन सोहळयात बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही सामुदायिक जबाबदारी असून प्रत्येकाने ती वैयक्तिकरीत्या कचरा टाकू नये. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली तर त्यांच्या वर्तनात सुधारणा होईल, असा आशावाद व्यक्त करत ते म्हणाले की, स्वच्छतेचे चांगले काम करणा-यांचे कौतुकही केले पाहिजे.

कोणत्याही योजनेत जनतेचा सहभाग असल्याशिवाय ती योजना यशस्वी होत नाही. यासाठी शौचालय बांधण्याबरोबरच त्याचा वापर करण्यासही प्रवृत्त केले पाहिजे.

सर्वानी येत्या २ ऑक्टोबर रोजी आपला किमान एक तास स्वच्छतेसाठी देऊन स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वितेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन बच्चन यांनी यावेळी केले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात यावर्षी स्वयंसेवकांसाठी ५० लाख तास श्रमदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमात स्वयंसेवकांनी आतापर्यंत ३३ लाख तास श्रमदान केले आहे.

२६ जानेवारी २०१७ पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच ६० लाख तास श्रमदान पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण हागणदारीमुक्त शहरांमध्ये देशातील १० शहरांपैकी ५ शहरे महाराष्ट्रातील असून सध्या राज्यातील १५ शहरांमध्ये संपूर्ण कच-याचे वर्गीकरण करण्यात येत आहे.

या अभियानात महिलांचा चांगला सहभाग असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली. येत्या २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक शहरात एका ठिकाणी नागरिकांना जमण्याचे आवाहन करण्यात येऊन त्या भागाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असेही श्रीमती म्हैसकर यांनी सांगितले.

यावेळी स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमितकुमार सनी, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कर्वे, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पाण्डेय, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह कागल, वेंगुर्ला, पाचगणी, सातारा, मुरगुड या नगरपालिकांचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष, तसेच पुणे व लोअर परळ येथील संपूर्ण स्वच्छ झालेल्या सोसायटीच्या अध्यक्षांचा बच्चन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन एनडीटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम चंद्रा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *