शिक्षणाच्या क्षेत्रात नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठने सेवा करणा-या व उत्कृष्ठ काम करणा-या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकांना देण्यात येणारे २०१५-१६चे ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने १०९ शिक्षकांची या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी निवड केली असून यात जिल्हा शिक्षक पुरस्कार, राज्य शिक्षक पुरस्कार, व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विविध आदर्श शिक्षक पुरस्कारांचा समावेश यात आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये ३८ प्राथमिक शाळांतील शिक्षक, माध्यमिक शाळातील-३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणोर प्राथमिक शिक्षक-१९, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षका-८, विशेष शिक्षक-२ अपंग शिक्षक-१ स्काऊट आणि गाईडचे प्रत्येकी दोन अशा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून हे पुरस्कार गणेशोत्सव संपल्यानंतर वितरीत करण्यात येणार आहे.
यंदाच्या ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी गणेशचतुर्थी येत असून त्यादिवशी राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी असल्याने हा पुरस्कार गणेशोत्सव संपल्यानंतरच प्रदान केला जाणार असल्याचे शनिवारी शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार योजना ही राज्यात १९५८-५९ पासून सुरू असून या पुरस्कारासाठी राज्यातील १८ प्राथमिक, ८ माध्यमिक, ३ विशेष शिक्षक अशा २९ शिक्षकांची निवड केली जाते.
या शिक्षकांना केंद्र सरकारकडून पुरस्काराची रक्कम ही २५ हजार रूपये इतकी दिली जाते. तर राज्य शिक्षक पुरस्कारासाठी १० हजार इतकी रक्कम आहे.
ही योजना १९६२-६३ पासून कार्यान्वित आहे. मात्र राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढीऐवजी ठोक रक्कम ही एक लाख रूपये अदा करण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणे ही रक्कम या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना देण्यात येणार आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये प्राथमिक शाळेतील मुंबईतील-३, ठाणे-पालघर रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी एक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे. तर माध्यमिक शाळांतून मुंबईतील चार शिक्षकांचा समावेश असून यात स्वामी मुक्तानंदचे सहायक शिक्षक अनिल बोरनारे, डीएस हायस्कूलचे अंकुश महाडिक, दहिसर येथील विद्याभूषण हायस्कूलचे संजय पाटील या शिक्षकांचा समावेश आहे.
तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगडच्या श्रीमती न.शा. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयातील शरदकुमार शेटे, रत्नागिरी जिल्ह्यातील कोकरे येथील जनता माध्यमिक शाळेतील विठ्ठल माने, यांचा यात समावेश आहे.
सावित्रीबाई आदर्श शिक्षकांमध्ये पालघर जिल्ह्यातल्या काटकर पाडा येथील सेवा आश्रम विद्यालयातील स्मिता माळवंदे यांचा मुंबई विभागातून हा पुस्कार जाहीर झाला आहे. कुर्ला येथील मनपा उर्दू शाळेतील रहेमान अतीकुर या शिक्षकाला अपंग शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.