अमेरिका खंडात धुमाकूळ घातलेल्या झिका व्हायरसचा धोका आता आशियातही वाढू लागला आहे. या आजाराचे अनेक रुग्ण आशियातही आढळून आले आहेत. संशोधकांनी म्हटले आहे की, भारतातील 1.2 अब्ज लोकसंख्याही झिकाचा धोका असलेल्या क्षेत्रात राहत आहे. आफ्रिका, आशिया आणि प्रशांत महासागराच्या काही भागात झिका विषाणू आपले हातपाय नव्याने पसरू शकतो. जगातील एक तृतीयांशापेक्षाही अधिक लोकसंख्या म्हणजे किमान 2.6 अब्ज लोक या भागात राहतात.
हा भाग सध्या तरी झिकाने ग्रासलेला नसला तरी या ठिकाणी डासांचा उच्छाद मोठाच आहे. तसेच तेथील हवामान झिकाचा फैलाव होण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे या ठिकाणीही झिकाचा धुमाकूळ होऊ शकतो. तत्पूर्वीच तेथील देशांनी सावध होऊन योग्य त्या उपाययोजना करणे हितावह आहे. झिकाच्या भौगोलिक वर्तुळात भारतातील लोकसंख्याच अधिक येते. 1.2 अब्ज भारतीयांना त्याचा धोका असून सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनच्या मात्र एकूण लोकसंख्येतील 24.2 कोटी लोकांनाच त्याचा धोका आहे. त्यापाठोपाठ इंडोनेशिया (19.7 कोटी), नायजेरिया (17.9 कोटी), पाकिस्तान (16.8 कोटी) आणि बांगलादेश (16.3 कोटी) या देशांना धोका आहे. डासांपासून फैलावणार्या या आजाराने लॅटिन अमेरिका आणि ब्राझीलमध्ये उच्छाद मांडला होता.