पश्चिम उत्तरप्रदेशात एकीकडे धार्मिक अशांतता पसरत असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं उदाहरण पाहायला मिळत आहे. संजय नगर कॉलनीत रोज संध्याकाळी मंदिरात एक 18 वर्षाची तरुणी मुलांनी कुराण शिकवताना दिसते. विशेष म्हणजे ही तरुणी हिंदू असूनही तिला कुराण तोंडपाठ आहे. आपलं हे ज्ञान फक्त आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनादेखील ती देत आहे. पुजा कुशवाहा असं या तरुणीचं नाव असून तीदेखील बारावीत शिकत आहे.
पुजा कुशवाहा 35 हून जास्त मुस्लिम मुलांना कुराणची शिकवणी देत आहे. पुजाने भाषेवर प्रभुत्व मिळवलं असून तिच्याकडे पाहून सर्व लोक आश्चर्य व्यक्त करत असतात. ‘इतक्या कमी वयात इतकं ज्ञान मिळवणं खरंच आश्चर्यकारक आहे. माझ्या मुलीला ती शिकवते यासाठी मी तिची आभारी आहे. तिचा धर्म हा आमच्यासाठी किंवा कोणत्याही मुलाच्या पाल्यासाठी महत्वाचा नाही’, असं रेशमा बागम सांगतात. त्यांच्या 5 वर्षाच्या आलिशाला पुजा शिकवणी देते.
पण पुजाला हे शिकली कुठून ? हा प्रश्न सर्वांना पडतो. ‘काही वर्षापुर्वी संगीता बेगम नावाची एक महिला आमच्या परिसरात राहत होती. त्यांचे वडिल मुस्लिम तर आई हिंदू होती. लहान मुलांना त्या कुराण शिकवत असे. मला कुराण शिकण्यात रस वाटला आणि त्यांच्या शिकवणीला जाण्यास सुरुवात केली. मी लवकरच प्रगती केली आणि सर्वांपेक्षा हुशार बनली’, असं पुजा सांगते.
पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी शिकवणी बंद केली. त्यांनी पुजाला हे काम पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर पुजाने शिकवणी घेण्याचा निर्णय घेतला. ‘त्यांनी मला इस्लाम धर्मातील महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. तुम्ही तुमचं ज्ञान दुस-यांना दिलं नाही तर त्याचा काहीच फायदा नाही’, असं पुजाने सांगितलं आहे.
महत्वाचं म्हणजे पुजा शिकवणीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाही. ‘अनेक मुलं गरिभ घरचे असून त्यांना पैसे देणं शक्य नाही, आणि मलाही त्याची गरज नाही’, असं पुजा बोलली आहे.