सलग सुट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार ते पाच किमीपर्यंत वाहतुकीची कोंडी पहायला मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आहेत.
सोमवारी गणपतीचे आगमन होत असून, रविवारला जोडून सुटी आल्याने अनेकजण आपापल्या गावी जात आहेत. मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सरकारने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफी केल्याने अनेकजण वाहनाने गावी जात आहेत.
शनिवार असल्याने पुण्याकडे येणाऱ्या नागरिकांचीही संख्या अधिक असल्याने वाहतुकीची कोंडी पहायला मिळत आहे. एक्स्प्रेसवर शनिवारी आणि रविवारी वाहतुकीची कोंडी नियमित झाली असून, आता गणेशोत्सवामुळे त्यात आणखी भर पडली आहे.