अमेरिकेतील मियामीमध्ये शिक्षणानिमित्त गेलेल्या 23 वर्षीय साईकिरण गौड या विद्यार्थ्याची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली आहे. साईकडे असलेला आयफोन चोरट्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोध केल्याने चार गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.
फोनवर मित्राशी बोलत असताना हल्लेखोर साईकिरणजवळ आले. मित्राने दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी त्याच्या हातातील आयफोन मागितला. तो देण्यास नकार दिल्यानंतर चार गोळ्या झाडण्याचे आवाज आले. रात्री 12.15 वाजता ही घटना घडली. गोळ्या झाडल्यानंतर साईकिरणचा जागीच मृत्यू झाला.
महिन्याभरापूर्वीच साईकिरण एमएस करण्यासाठी मियामीला आला होता. साईकिरणच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. साईच्या मृत्यूने हैदराबादमधील कुशईगुडा या गावावर शोककळा पसरली आहे.
