लग्नाचे आमिष दाखवून निर्मळ-गोमपाड्यातील एका विवाहित तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले असून संबंधित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेताच तरुण फरार झाला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या बापानेही शेजारच्या घरात घुसून एका महिलेचा विनयभंग केला होता. ऑस्टीन गोम्स असे या तरुणाचे नाव असून तो निर्मळ-गोमपाडा येथे राहतो. त्याने फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला विरार येथील एका हॉटेलात नेले. तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. या वेळी त्याने आपल्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह शूटिंगही केले. त्यानंतरही राजोडी येथील एका रिसॉर्टमध्येही ऑस्टीनने तिच्यावर बलात्कार केला होता. यानंतर तो तिला टाळू लागला. तरुणीने लग्नाची विचारणा केल्यानंतर ऑस्टीनने तिच्याशी संबंधच तोडले. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे सदर तरुणीच्या लक्षात आले. तिच्या नातलगांनी ऑस्टीनच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यावर त्याचे यापूर्वीच लग्न झाल्याचे आणि त्यानंतर घटस्फोट झाल्याची माहिती मिळाली. परिणामी, लग्नाचे आमिष दाखवून ऑस्टीनने आपल्यावर दोनदा बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरुणीने विरार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.