भारतात आजारी व्यक्तींची शुश्रूषा करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. फ्लॉरेन्स नाईटिंगेल, बाबा आमटे, मदर तेरेसा यांनी रुग्णांच्या सेवेसाठी जीवन वेचले; पण याच भारतात सध्या परिचारिकांचा तुटवडा भासत आहे. “द एफआयसीसीआय-ईवाय‘च्या अहवालात परिचारिकांच्या संख्येत भारताचा क्रमांक 75 वा आहे. 133 विकसनशील देशांमधील स्थितीचा अभ्यास करून हा निष्कर्ष मांडला आहे.
वैद्यकीय व्यवसायात परिचारिकांचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. याबाबत पाहणी केली असता, भारतात एक हजार नागरिकांमागे डॉक्टरांची संख्या 0.7, तर परिचारिकांची संख्या 1.7 असल्याचे दिसून आले. यामुळे 133 देशांमध्ये भारताचे स्थान 75 वे आहे. परिचारिकांची वाढती मागणी पूर्ण होण्यासाठी देशात 24 लाख परिचारिकांची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी भारतातून मोठी कुमक जगभरात पुरविली जात असली तरी देशात मात्र आरोग्यसेवेत अनेक कमतरता आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. भारतातील शुश्रूषा क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत. परिचारिकांची उपलब्धता, वितरण, या करिअर करण्याच्यादृष्टीने संधी नसणे, कामगारांसाठी लाभदायी योजना व समान वेतनाचा अभाव अशा अनेक समस्या यात आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यापेक्षा विदेशात जास्त पगार, कामाचा कमी ताण असलेल्या नोकऱ्या उपलब्ध असल्याने अनेक परिचारिका त्याकडे आकृष्ट होतात, हेही भारतात त्यांची संख्या कमी असण्याचे एक कारण आहे. तसेच मनुष्यबळाची उपलब्धता व परिचारिका प्रशिक्षण संस्था यांचे व्यस्त प्रमाण येथे आहे. एकूण प्रशिक्षण संस्थांपैकी 52 टक्के संस्था केवळ दक्षिण भारतातच आहे.
राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सरकारी व खासगी क्षेत्रातील शुश्रूषा क्षेत्रात तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. यासाठी काम करण्याच्या पद्धतीत बदल, परिचारकांच्या सध्याच्या भूमिकेचा विस्तार करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आरोग्य क्षेत्रात आपले योगदान देण्याची संधी उपलब्ध करणे आदी उपाययोजना आखण्याची शिफारसही केली आहे.
तरतुदी बदलण्याची गरज
भारतीय परिचारिका सेवा कायदा देशात 1947 मध्ये अमलात आला. 1947 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्यानुसारच अजूनही या क्षेत्राचा कारभार चालत आहे. मात्र, आरोग्य क्षेत्राच्या आताच्या गरजा लक्षात घेऊन या तरतुदींमध्ये बदल करणे आवश्यक आहे, अशी सूचना अहवालात केली आहे.
रुग्णसेवेसाठी…
133 एकूण देशांचा अभ्यास
75 भारताचा क्रमांक
0.7 व 1.7 दर हजारीमागे डॉक्टर व परिचारिकांची संख्या
24 लाख डॉक्टर व परिचारिकांची गरज