विलास शिंदे अनंतात विलीन

‘जब तक सूरज चाँद रहेगा, विलास शिंदे आपका नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई पोलिस कॉस्टेबल शहीद विलास शिंदे यांच्या पार्थिवावर गुरुवारी शिरगाव, (ता. वाई) येथे हवेत तीन फैरी झाडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोेशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

शहीद पोलिस कॉस्टेबल विलास शिंदे यांचे पार्थिव गुरुवारी पहाटे शिरगाव येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीनजीक अंत्यदर्शनासाठी ते ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिस बँन्ड पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सकाळी 9.15 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. अंत्ययात्रेच्या मार्गावर गावात ग्रामस्थांनी सर्वत्र रांगोळी काढून तसेच त्याच्यावर फुले टाकली होती. ‘अमर रहे अमर रहे विलास शिंदे अमर रहे’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहचली. येथे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद‍्गल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी पार्थिवाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. पोलिसांच्या 10 जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद विलास शिंदे यांचा मुलगा दिपेश याच्या हस्ते अग्नी देण्यात आला.

यावेळी झालेल्या शोकसभेत जिल्हाधिकारी अश्‍विन मुद‍्गल श्रद्धांजली वाहताना म्हणाले, सामान्य लोकांच्या रक्षणार्थ कर्तव्य बजावताना साताराच्या सुपुत्राने हौतात्म्य पत्करले आहे. शासनाच्या वतीने मी शहीद विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहतो. शहीद शिंदे यांचे बलिदान राज्यासाठी, देशासाठी प्रेरणा देणारे आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, शहीद शिंदे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांनी पत्करलेले हौतात्म्य पोलिस दलाची शान वाढविणारे आहे. त्यांच्या बलिदानाने सातारा जिल्हा, वाई तालुका पवित्र झाला आहे. पोलिस दलातर्फे  त्यांना सलाम.

प्रारंभी पोलिस उपअधीक्षक दीपक हुंबरे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, खंडेराव धरणे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, वाई पंचायत समितीच्या सभापती उमा बुलुंगे, गट विकास अधिकारी दीपा बापट,   निवृत्त सहायक पोलिस आयुक्‍त बाजीराव भोसले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश शिंदे, नंदकुमार घाडगे, अनिल शेंडे आदींसह उपस्थित अधिकारी, पदाधिकारी,

ग्रामस्थ यांनीही अत्यंदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, जोशी विहीर ते गावात ठिकठिकाणी शहीद शिंदे यांचे बॅनर लावून ग्रामस्थांच्या वतीनेही आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान, पोलिसांना मारहाण करणार्‍या समाजकंटकाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.

जिल्हाधिकारी व एसपींचा कुटुंबियांना आधार

शहीद पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचे पार्थिव विद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर जिल्हाधिकारी अश्‍विन मुद‍्गल व जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी पुष्पहार घालून आदरांजली. अश्‍विन मुद‍्गल व संदीप पाटील यांनी शहीद विलास शिंदे यांचे वडील विठ्ठल शिंदे, आई कलावती, पत्नी साधना, मुलगा दिपेश आणि मुलगी कल्याणी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *