ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर ऊर्फ काका बडे यांचे गुरुवारी पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर यवतमाळमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी यवतमाळमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मातीच्या आणि शेतकऱ्यांच्या कविता सांगणारा कवी म्हणून शंकर बडे प्रसिद्ध होते. ‘गुलब्या’ ही त्यांची लघुकथा विशेष गाजली होती. अर्णीमध्ये झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. नुकताच त्यांचा यवतमाळमध्ये सत्कारही करण्यात आला होता. राज्य सरकारने त्यांची ‘बळीराजा चेतना अभियान दूत’ म्हणून नियुक्ती केली होती.
बडे यांना गेल्या मंगळवारी ब्रेन हॅमरेजचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. बडे यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येतो आहे.