कोणताही गुन्हा न करताही ‘तुरुंगवास’ भोगण्याचा आनंद आता कोणालाही घेता येणार आहे. तुरूंगपर्यटन म्हणता येईल, या संकल्पनेला. तुरुंगातील जीवन कोणालाच नको असते. पण पर्यटक म्हणून रात्रभर तुरुंगात राहण्याची सोय तेलंगणा सरकारने केली आहे. तो अनुभव घेण्याचा खर्च माणशी ५०० रुपये आहे. २२० वर्षांपूर्वीच्या संगारेड्डी (जि. मेडक) येथील तुरुंगाला पर्यटक भेट देतात. दिवसभर या तुरुंगाच्या आयुष्याचा थेट अनुभव घ्यायचा असेल तर पैसे भरून घेता येईल.
या तुरुंगाचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले असून त्यात २४ तासांच्या तुरुंगवासाची आॅफर देण्यात आली आहे. तुरुंग विभागाने ‘तुरुंग अनुभवा’ (फिल द जेल) ही अभिनव कल्पना लढवली. स्थानबद्ध करून ठेवल्यावर कसे वाटते, याचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे ते येथे पैसे भरून घेऊ शकतील.
तुरुंगातील या मुक्कामात पर्यटकांना थेट कैद्याचा खादी गणवेश दिला जाईल. कैद्यांना दिली जाते, ती जेवणाची पत्र्याची ताटली व त्याचाच ग्लास, मग, आंघोळीचा साबण, अंथरूण, पांघरूण, पंखा व इतर सोयीसुविधा राज्य सरकारच्या तुरुंग नियमांप्रमाणे दिल्या जातील.
अशी आॅफर राज्य सरकारने दिली असली तरी अजून कोण्या पर्यटकाने याचा ‘लाभ’ घेतलेला नाही, असे तुरुंगाचे उप अधीक्षक लक्ष्मी नरसिंह यांनी सांगितले. ज्यांना तुरुंगाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी तुरुंग प्रशासनाला पूर्व कल्पना देणे आवश्यक आहे. म्हणजे ते आवश्यक त्या तयारीत असतील, असे नरसिंह म्हणाले. या हौशी कैद्यांना जेवण, चहा आणि नाश्ता तुरुंगाच्या नियमांप्रमाणे दिला जाईल. कैद्यांना करावे लागणारे कोणतेही काम या पर्यटक कैद्यांना करावे लागणार नाही.