समाजाला रुचत नाही म्हणून दबावाखाली येऊन दोन समलिंगी संबंध असणाऱ्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एकीचा मृत्यू झालाय.
… आणि सगळंच बिनसलं
रोशनी आणि ऋजुता या शेजारी राहणाऱ्या दोन मुली एकमेकींत गुंतल्या होत्या. त्या दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर त्या दोघी अनेकदा एकमेकींना भेटत होत्या. परंतु, एका नातेवाईकांच्या दृष्टीत त्यांचं नात आलं… आणि सगळंच काही बिनसलं.
ऋजुताचा आत्महत्येचा प्रयत्न
यानंतर ऋजुताच्या वडिलांनी रोशनी आणि तिच्या बहिणीला स्थानिक नेते महेंद्र नागते यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. याच वेळी त्यांचा फोन खणाणला… इकडे ऋजुतानं फिनाईल प्राशन केलं होतं. त्यामुळे तिला तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं.
रोशनीनं केली आत्महत्या
हे २१ वर्षीय रोशनीला समजल्यानंतर तिनं घरी जाऊन पंख्याला गळफास लावून घेतला. दुसऱ्या दिवशी रोशनी दरवाजा उघडत नाही हे पाहून तिच्या घरच्यांनी दरवाजा तोडला… मात्र, एव्हाना रोशनी गतप्राण झाली होती.
दरम्यान, ऋजुताचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलंय. पण, रोशनीच्या आत्महत्येमुळे तिला मोठा धक्का बसलाय.
दोघांना अटक
या प्रकरणात पोलिसांनी ऋजुताचे वडिल किशोर गवांड आणि नेते महेंद्र नागते यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणं) आणि ५०७ (धाकदपटशा दाखवणं) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भारतात मुंबईसारख्या शहरांतदेखील समलिंगी संबंधांना मान्यता अजून मिळू शकलेली नाही, हे या घटनेमुळे धडधडीतपणे समोर आलंय.