‘पूजा साहित्या’त पतंजलीचे 8 हजार कोटी रुपये!

धार्मिक पूजेसाठी लागणारे वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या प्रस्थापित कंपन्यांना आव्हान देण्यासाठी पतंजलीने या क्षेत्रात आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. “पतंजली आस्था‘ या ब्रॅण्डखाली उदबत्ती, धूप, दिवे यासारख्या घरगुती पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्यात येणार आहे.

घरगुती पूजा साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उत्पादनांना मागणी वाढत आहे. ऍमेझॉननेदेखील या उत्पादनांच्या विक्रीत दोन आकडी वाढ नोंदविली आहे. पुढील दोन महिन्यात “पतंजली आस्था‘ची उत्पादने बाजारपेठेत दाखल होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. “अनेक प्रस्थापित कंपन्यांच्या पूजेच्या सामानात हानिकारक रसायनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. उदबत्ती किंवा धूपमध्ये या रसायनांच्या वापरामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या उत्पादनांची गरज आहे. म्हणून आम्ही आस्था ब्रॅंडची स्थापना करीत आहोत”, अशी माहिती पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली.

कंपनी या उत्पादनांच्या विक्रीसाठी दिवाळीपुर्वी सुमारे दीड हजार विक्रेत्यांसोबत भागीदारी करणार आहे. शिवाय, शुभकार्ट नावाच्या संकेतस्थळावर त्याची ऑनलाईन विक्री केली जाणार आहे. उदबत्ती बाजारपेठेची उलाढाल 20,000 कोटी रुपये आहे. त्यापैकी 2,500 कोटी रुपयांची उलाढाल संघटित आहे. योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीने एफएमसीजी क्षेत्रात अनेक कंपन्यांना आव्हान दिले आहे. सध्या फ्युचर समुहाच्या किरकोळ दुकानांमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या उत्पादनांमध्ये पतंजलीचा तिसरा क्रमांक लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *