दारू पिण्यास पैसे दिले नसल्याने मुलाने आईच्या डोक्यात काठीने मारहाण करून खून केल्याची घटना पलूसमध्ये गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली. अलका संजय पाटील (वय 52) असे मृत महिलेचे नाव आहे. रवी संजय पाटील (वय 32) असे संशयिताचे नाव आहे. खून केल्यानंतर रवी पाटीलने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील नवोदय विद्यालयाच्या पूर्वेस नवीन वसाहतीत अलका आणि त्यांचा मुलगा रवी हे राहत होते. रवी हा वडाप जीपवर चालक म्हणून काम करीत आहे. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. त्याला दारूचे व्यसन आहे. अलका या एमआयडीसीतील कारखान्यात रोजंदारीने काम करीत होत्या. इतरवेळी त्या शेतात मजुरी करीत होत्या.
गुरुवारी सायंकाळी अलका या शेतातून कामावरून परत आल्यानंतर रवीने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु अलका यांनी पैसे देण्यास नकार दिला. दोघांत वादावादी झाली. त्यानंतर रवीने रागाच्या भरात लाकडी दांडके अलका यांच्या डोक्यात मारले. डोक्यात जबर मार लागल्याने त्या खाली कोसळल्या. यामध्ये त्यांचा जागेवर मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर रवीनेही घरातील कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले. तो घरातून ओरडत बाहेर पडला. ही घटना शेजार्यांना कळताच त्यांनी पलूस पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी रवीला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर सांगलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अलका पाटील यांचे माहेर पलूस असून त्यांचे येळावीतील संजय पाटील यांच्याशी लग्न झाले होते.लग्नानंतर त्यांनी पलूसमध्येच जागा घेऊन घर बांधले होते. पतीचेही वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचे लग्न झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलगा रवी हा सतत दारू पिण्यास पैसे मागात होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या.