किडनी भ्रष्टाचार रॅकेटमध्ये हिरानंदानी रुग्णालयातील आतापर्यंत १४ डॉक्टरांना पोलीस कोठडी मिळाल्यामुळे रुग्णालयातील या भयानक भ्रष्टाचाराच्या मुळाशी फार मोठा खलनायक असून, तो कोण आहे? याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. पोलीस कोठडीत डांबण्यात आलेल्या डॉक्टरांपैकीच काही जणांकडून यामागील खरा खलनायक लवकरच उघड होईल.
दरम्यान, किडनी प्रकरणातील आरोपींची पाळेमुळे थेट श्रीलंकेपर्यंत एका किडनी रॅकेट गटाशी पोहोचल्याची चर्चा असून, रुग्णालयातील सूत्रांनी त्याला दुजोरा दिला आहे.
एवढय़ा भयानक प्रकारानंतर हिरानंदानी रुग्णालयाने पोलिसांकडे तक्रार केली आहे का? याबाबतची माहिती देण्यास डॉ. चटर्जी यांनी नकार देऊन फोन बंद केला. त्यानंतर वारंवार फोन करूनही त्यांनी फोन उचललाच नाही.
पवईतील हिरानंदानी रुग्णालयामधून चालवण्यात येणा-या ‘किडनी रॅकेट’चे जाळे देशभर पसरल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. गरीब रुग्णांच्या परिस्थितीचा फायदा घेत अवयवांचा सौदा करत; गेल्या पाच वर्षात किडनी रॅकेटच्या माध्यमातून तब्बल ६३ कोटींचे आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या किडनी तस्करीत रुग्णालयातील डॉक्टरांचा हात असून विशिष्ट टोळी यासाठी काम करत आहे. या टोळीच्या सहाय्याने १३० जणांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. या रॅकेटची टोळी थेट श्रीलंकेपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यामागे मोठे आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
