महाड दुर्घटनेतील एसटीचे सांगाडे सापडले

महाड येथील सावित्री पुल दुर्घटनेतील बेपत्ता वाहने व प्रवाशांच्या शोधमोहिमेला मोठे यश मिळाले असून कोसळलेल्या पुलापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर या अपघातग्रस्त एसटी बस सापडली.

२ ऑगस्टच्या मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक टवेरा गाडी वाहून गेली होती. यातील ४१ बेपत्ता प्रवाशांपैकी २६ जणांचे मृतदेह सापडले असून १५ प्रवासी बेपत्ता आहेत.

बुधवारी सायंकाळी दुर्घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर बसचे अवशेष असल्याचा सुगावा शोधपथकांना लागला होता. त्यानुसार स्कुबा डायव्हर्सनी गुरुवारी सकाळी पाण्यात जाऊन बसचे अवशेष असल्याची खात्री केली.

त्यानंतर क्रेनने बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र पहिल्या प्रयत्नात क्रेनचा दोर तुटल्याने बस बाहेर येऊ शकली नाही. त्यानंतर दुस-या प्रयत्नात एसटी बसचा सांगाडय़ाचा अर्धा भाग दुपारी साडेचारच्या सुमारास बाहेर काढला. तर रात्री पावणेआठच्या सुमारास बसच्या छताचा भाग बाहेर काढला.

या बसचा क्रमांक एमएच ४० एन ९७३९ असून ती १९ प्रवाशांसह राजापूरहून बोरीवलीला जात होती. यापैकी ६ प्रवाशांचे मृतदेह सापडले असून बसचे छत वेगळे झालेले असल्याने बसमध्ये मृतदेह आढळण्याची आशा फोल ठरली.

चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला होता

अपघातग्रस्त बस बाहेर काढल्यानंतर एसटीच्या अधिका-यांनी तिची पाहणी केली. यावेळी बसचे हँडब्रेक लावलेले असल्याचे आढळले. त्यामुळे तुटलेला पूल पाहून चालकाने बस थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, हे स्पष्ट झाले आहे. मात्र बसचा वेग जास्त असल्याने बस न थांबता नदीत पडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *