परदेशी नागरिकांनी लुटले केरळमध्ये एटीएम

केरळच्या तिरुअनंतपुरम येथे एक हायटेक चोरीची घटना उघडकीस आली असून, तीन परदेशी नागरिकांनी एटीएम लुटल्याचे उघडकीस झाले आहे. या लुटीप्रकरणी एकाला मुंबईत पकडण्यात आले आहे. परदेशी नागरिकांचे हे कृत्य येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे उघडकीस आले आहे. या तीन परदेशी नागरिकांपैकी एक रोमानियाचा आहे. अन्य दोन नागरिकांना पकडण्यासाठी केरळ सरकार इंटरपोलची मदत घेण्याच्या तयारीत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन परदेशी नागरिक एटीएममध्ये जाऊन तेथे एक इलेक्‍ट्रॉनिक यंत्र बसवीत होते. त्या यंत्राच्या मदतीने तेथे येणाऱ्या नागरिकांच्या बॅंक अकाउंटची माहिती ते मिळवीत. तसेच एटीएम कार्डच्या पासवर्डबाबत माहिती घेत असत. त्यानंतर तसेच बनावट एटीएम तयार करून त्याद्वारे नागरिकांच्या अकाउंटमधील पैसे काढण्यात येत होते. 
 
या नागरिकांनी सोमवारी या प्रकारे जवळपास 22 नागरिकांच्या अकांउटमधील पैसे काढल्याची घटना उघडकीस आली असून, सर्वांना त्याबाबत मेसेजही आले आहेत. या नागरिकांनी लुटलेली रक्कम ही साडेचार लाखांच्या आसपास आहे, असे पोलिसांनी सांगितले. 
 
या तीन परदेशी नागरिकांव्यतिरिक्त अन्य कोणी यामध्ये सहभागी आहे काय, तसेच त्यांनी अकाउंटबाबत कशी माहिती मिळविली, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
या तपासाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आम्ही सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असून, त्यात हे तीन परदेशी नागरिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या लुटीमध्ये या नागरिकांचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळे यामध्ये आणखी कोणी सहभागी झाले आहे काय, याचा तपास सध्या सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *