अवघ्या चार रुपयांवरून झालेल्या वादातून उत्तर प्रदेशातील मोहद्दीनपूरमध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
घुरपूरमधील मोहद्दीनपूरमध्ये राहणाऱ्या श्रीनारायण द्विवेदी यांच्या मालकीची पीठाची गिरणी आहे. शु्क्रवारी रात्री दलित वस्तीत राहणाऱ्या इंद्रजित भारतीय यांचा मुलगा रजत (१५) हा पीठ आणण्यासाठी गिरणीत गेला. पीठाचे पैसे देण्यासाठी रजत याच्याकडे चार रुपये कमी होते. गिरणी मालक श्रीनारायण यांचा मुलगा राजेशने चार रुपयांवरून रजतला चांगलेच सुनावले आणि दुसऱ्या वेळेस बरोबर पैसे घेऊन यायला सांगितले. संतापलेल्या रजतने घरी जाऊन २० रुपयांची नोट आणली व चार रुपयांवरून खरी-खोटी सुनावल्यामुळे बाकीचे पैसे तुलाच ठेव, असे राजेशला सांगितले. रजतच्या या वर्तणुकीमुळे राजेशला राग आला व त्याने बाजूला पडलेला हातोडा रजतच्या डोक्यात घातला.
रजतला मारहाण केल्याची बातमी कळताच दलित वस्तीतील अनेक जणांनी गिरणीकडे धाव घेतली. संतापलेल्या लोकांनी श्रीनारायण यांच्या घरावर दगडफेक केली. घरावर झालेली दगडफेक आणि मोठा जमाव पाहून राजेशने आपल्या घरातील बंदुकीने समोरच्या जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात राहुल (१९) आणि आशू उर्फ शुभम (१८) या दोघांचा मृत्यू झाला. तर रजत कुमार, विवेक आणि विकास हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी सुरेशकुमार दि्ववेदी, राजेशकुमार, राकेशकुमार आणि शनी द्विवेदी या चार जणांना अटक केली.

