गेल्या काही दिवसांत सॅण्डल्सचीही फॅशन आपण बदललेली पाहिली आहे. हिल्स, हाय हिल्स, फ्लॅट अशा विविध प्रकारच्या सॅण्डल्स, चप्पल्स तुम्ही वापरली असेल. मात्र आता बाजारात आणखी एक नवी फॅशन येऊ घातली आहे ती म्हणजे बेअरफूट सॅण्डलची. बेअरफूटला आपण सॅण्डल म्हणण्यापेक्षा पायातील चैन किंवा पैंजणाचा दुसरा प्रकारही म्हणू शकू.
समुद्र ठिकाणी फिरायला गेल्यावर अनवाणी चालण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे समुद्र ठिकाणी फेरफटका मारण्याची हौस असणा-यांनी या बेअरफूटचा नक्कीच वापर करावा. त्यातच बेअरफूटसाठी कधीकधी शिंपल्यांचाही वापर केला जातो. त्यामुळे बीचवर फेरफटका मारताना या शिंपल्यातील बेअरफूटचा अधिक सोयीस्कर वापर करता येईल. या बेअरफूट सॅण्डल्सना खाली सोल नसतो. ते केवळ पायाच्या घोटय़ाभोवती पैंजणासारखं घातलं जातं.
फक्त या बेअरफूटचा आकार पैंजणापेक्षा बराच मोठा असतो. म्हणजे पायाच्या घोटय़ापासून ते बोटापर्यंत ही साखळी घालता येते. त्याचबरोबर यापेक्षाही मोठे बेअरफूट बाजारात उपलब्ध आहेत. काही वेळा मॅचिंग सॅण्डल्सना या बेअरफूटचा वापर केला तर पायांना उत्तम कॉम्बिनेशन जमून येतं.
खडयांपासून ते समुद्रातील शिंपल्यापर्यंत सारे काही डिझाईन्स आपल्याला यात पाहायला मिळेल. त्याचबरोबर विविध प्रकारचे लेस याला गुंडाळलेले असल्यामुळे या बेअरफूटला एक वेगळाच साज चढतो. फॅशन जगतात सध्या या बेअरफूटचा बोलबाला वाढल्याने दिवसेंदिवस याचे विविध प्रकार नित्याने बाजारात येत आहेत.
कॉलेजिअन्स तरुणींमध्ये या बेअरफूटची पसंती अधिक असलेली पाहायला मिळते. एवढेच नाही तर अनेक जणी या हँडमेड बेअरफूट वापरताना दिसतात. कारण हे बेअरफूट घरच्या घरी बनवणंही सोपं असल्याने बाजारात असलेल्या रेडिमेड बेअरफूटपेक्षा आपणच घरी बनवून एखाद्या कार्यक्रमात चमकावं असंही प्रत्येकीला वाटत आहे.
त्यातच काही जणी हँडमेड बेअरफूट बनवून बाजारात विकतानाही दिसतात. याची किंमत केवळ दोनशे ते दोन हजारांपर्यंत असल्याने आपल्याला हव्या त्या रंगात, ढंगात, डिझाईनमध्ये हे बेअरफूट सहज उपलब्ध आहेत.
थ्री फोर्थ स्कर्ट्सवर हे बेअरफूट सॅण्डल्स अधिक उठून दिसतात. शिवाय कोणत्याही सेमी फॉर्मल्स लूकवर हे बेअरफूट अगदी मॅच होतात. काही देशांत बीच वेडिंग ही पद्धत फार प्रसिद्ध आहे. म्हणजे समुद्र ठिकाणी लग्न करणं. त्यासाठी बेअरफूट वापरलं जातं. लहान मुलांसाठीही खास बेअरफूट सॅण्डल्सचा वापर केला जातो.
नाजूक नक्षीदार साखळी पैंजणीप्रमाणे दिसत असली तरी त्याला सॅण्डलचा आकार असतो. त्यामुळे हे पायात घातल्याने पायांना शोभा येते. लग्नकार्यात पायांना मेंदी काढण्याची आपल्यात पद्धत आहे. त्या मेंदीवर जर हे नक्षीदार बेअरफूट घातले तर पाय उठून दिसतील. गेल्या काही दिवसांत मार्केटमध्ये या बेअरफूट सॅण्डल्सचा ट्रेंड भलताच वाढलेला पाहायला मिळतोय.