महाड दुर्घटनेत दुस-या दिवशीही एनडीआरएफ पथके, नौदल आणि तटरक्षक दलातर्फे शोधमोहिम सुरुच असून आतापर्यंत केवळ सात मृतदेह सापडले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूरदरम्यान सावित्री नदीवरील जुना ब्रिटीशकालीन पूल मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या घटनेनंतर दुस-या दिवशीही शोधमोहिम सुरुच आहे.
बुधवारी सायंकाळी उशीरा मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळपासूनच बचावपथकातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) पथके, नौदल आणि तटरक्षक दलाने स्थानिक गावकरी आणि मच्छिमार यांच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
गुहागर येथील तवेरा गाडी (एमएच ०४-७८३७) महाड दुर्घटनेत बेपत्ता झाली होती. मॅग्नेटच्या सहाय्याने नदीत बुडालेल्या वाहनांचा शोध घेण्यात येत आहे. अद्याप हाती काही लागलेले नाही. १२ बोटींच्या सहाय्याने पुन्हा शोध मोहिम सुरु आहे. या शोध मोहिमेत १६५ जवान सहभागी असून, स्कूबा ड्रायव्हिंग पथक घटनास्थळी शोध घेत आहेत. पूर ओसरत नसल्याने शोध मोहिमेत अडचणी निर्माण होत आहेत.
या दुर्घटनेत ज्यांचा दुदैवी अंत झाला आहे त्यांचा शोध घेण्यासाठी कोकण व मुंबई परिसरातून येणाऱ्या नातेवाईकांसाठी अंजुमन दर्दमंदाने तालीम तरक्की ट्रस्टच्या इसाने कांबळे येथील कालसेकर हायस्कुल येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. १९९८ सालची या ट्रस्टची नोंदणी असून संस्थेतर्फे या परिसरात विविध समाजिक कार्ये केली जातात. संस्थेतर्फे लोकांना मोफत पाणी आणि सकाळी छोट्या कंटेनरमधून नास्त्याचे वाटप करण्यात आले. आता दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती पुरकर यांनी दिली. लोकांच्या निवासाचीही व्यवस्था घटनास्थळापासून पाच मिनिटांच्या अंतरावर करण्यात आलेली आहे.
तरी नातलगांच्या शोधासाठी येणाऱ्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
मुफ्ती रफिक पुरकर – ८५५१००४८४८
मुफ्ती मुझफ्फर सैन – ८६९८३०६१६१
मौलाना रज्जाब अली बरमारे – ९४२२४९५९६४
मौलाना इशाक घारे – ९०२८५६२७९१
मुफ्ती खालिद झतम – ९४२२०७६३०७