तीन महिन्यांत शिक्षा करा; अन्यथा आत्महत्या

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे बंदुकीच्या धाकाने माय-लेकीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना तीन महिन्यांत शिक्षा करा; अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असा इशारा कुटुंबाने दिला आहे.

याबाबत बोलताना संबंधित 13 वर्षीय मुलीच्या वडिलांनी सांगितले, की त्यांनी आम्हाला मारहाण केली, आम्हाला लुटले, माझ्या मुलीसोबत त्यांनी जे केले ते सगळ्यांनाच माहीत आहे. आता माझ्या पत्नीने व मुलीने त्यांना शिक्षा द्यावी, अशी माझी इच्छा आहे, जर त्यांना पुढील तीन महिन्यांत शिक्षा झाली नाही, तर आम्ही तिघेही आत्महत्या करू. दरोडेखोरांच्या या टोळक्‍याने या तिघांचे हात आणि पाय बांधून त्यांना मारहाण केली. त्यांनी पाणी मागितले किंवा जरा जरी हालचाल केली, तरी मारहाण केली जात होती. या कुटुंबाने हा अमानुष प्रकार 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळविल्यानंतरही काहीही मदत मिळाली नाही.

दरम्यान, बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी करणाऱ्या डॉक्‍टरने तिचे उपचार योग्य प्रकारे केले नसल्याने आणि तिला लज्जास्पद प्रश्‍न विचारल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने डॉक्‍टरला समन्स बजावले असून, पोलिसांनीही पॉस्को कायद्याखाली गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी फटकारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *