बारा वर्षांची असताना राजधानी दिल्लीतून बेपत्ता झालेली एक मुलगी तब्बल दहा वर्षांनी घरी परतली आहे. सध्या बावीस वर्षे वय असलेल्या या मुलीने आपले अपहरण करण्यात आले होते आणि काही लोकांकडून गेल्या 10 वर्षांत अनेकवेळा बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली होती. तसेच पाठपुरावाही केला होता, मात्र त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नसल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीप्रमाणे 2 जुलै 2006 रोजी त्यांची मुलगी दिल्लीतून बेपत्ता झाली होती. त्यानंतर त्यांनी खजुरी खास पोलिस स्थानकात अनेकदा तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या तक्रारीकडे पोलिसांनी लक्ष दिले नाही. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर तब्बल वर्षभराने त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून याबाबत माहिती दिली. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे बेपत्ता मुलगी परत आल्यानंतर खजुरी खास पोलिस स्थानकात अनेकदा गेल्यानंतरही हाच अनुभव आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘या प्रकरणाबाबत काहीही माहिती नव्हते. आम्ही या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडत आहोत. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करून पीडित मुलीचा जबाब ऐकून घेतल्यानंतर आणखी काही कलमांतर्गत गुन्हा दाखल करून घेणार आहोत‘, अशी माहिती दिल्लीचे (ईशान्य) पोलिस उपायुक्त ए के सिंगला यांनी दिली. दरम्यान मंगळवारी एक महिला पोलिस अधिकाऱ्याने पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे.