दुचाकी चालकांना विना हेल्मेट पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर गुन्हा नोंद करण्याच्या परिवहन विभागाच्या आदेशाला पेट्रोल डिलर असोशिएसनने आव्हान दिले आहे. पेट्रोलचा समावेश जिवनावश्यक कायद्यात असल्यामुळे ते खरेदी करण्यापासून ग्राहकांना रोखता येणार नाही. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दुचाकी स्वाराची असल्यामुळे पंप चालकांवर कारवाई केल्यास राज्यातील सर्व पेट्रोल पंप बंद करण्याचा इशारा असोशिएसनने दिला आहे.
राज्यातील वाढते अपघात आणि गुन्हेगारीची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेटविना पेट्रोलसाठी आलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल देऊ नये, असे आदेश नुकतेच दिले आहेत. या आदेशाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले असले तरी वाहन मालकांमध्ये नाराजी पसरली आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पंप चालकांना सीसीटीव्ही बसवावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे.
कमी अंतराच्या प्रवासामुळे शहरात हेल्मेट बाळगणे अडचणीचे आहे. सरकारने आदेश काढला असला तरी अनेक दुचाकीस्वार विना हेल्मेट पंपावर येण्याची शक्यता आहे. अशावेळी पंपावरील कर्मचारी आणि दुचाकीस्वारांमध्ये भांडणे होण्याची शक्यता आहे. भांडणे सोडवण्यात अन्य कर्मचार्यांचा वेळ जाईल, शिवाय पोलीसांतही तक्रारी करण्याची डोकेदुखी होणार आहे. परिवहन विभागाने पेट्रोलपंपांवर पोलीस सुरक्षा देण्याच्या सुचना गृह विभागाला द्याव्यात. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पेट्रोल पंपधारकांना वेठीस धरणे योग्य नाही.
प्रत्येक पेट्रोल पंपवर सीसीटीव्ही बसवण्यास पंपचालक तयार आहेत. विना हेल्मेट पेट्रोल मागणार्यांचे फुटेज देण्याबाबत त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.पंपचालकांनी दिले आहे. त्यांच्या मते विना हेल्मेट आलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल देऊ नये, असा जगात कुठेही आदेश नाही. तरीही सरकारने आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या आदेशाने आमचाही त्रास वाढणार असल्यामुळे यावर विचार करण्यासंदर्भात 29 जुलै रोजी पंपचालकांची पुण्यात बैठक आयोजित केली असल्याची माहिती असोशिएशनचे अध्यक्ष समीर लडकत व उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी दिली आहे.