रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नवनव्या कल्पना अंमलात आणत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे आता स्वत:चे एफएम स्टेशन ‘रेल रेडिओ’ नावाने सुरू करणार असून सुरुवातीला एक हजार लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून तालासुरांच्या साथीने प्रवास करता येणार आहे.
प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. दुरांतो, शताब्दी आणि राजधानी या रेल्वेमध्ये सध्या प्रवाशांना स्थानकासंबंधी तसेच इतर आवश्यक ती माहिती देण्याची सुविधा आहे. हीच सुविधा सुमारे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून संगीत, विनोद, सामान्यज्ञान यावर आधारित कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन स्थितीत या सेवेचा चांगला फायदा होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सुरुवातीला एक हजार गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या या सुविधेशी जोडल्या जातील. यासाठी रेल्वे बोर्डात स्टुडिओ बनवण्यात येणार आहे. रेल्वेचा इतिहासही या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.