भारतात सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कबाली’ची धूम असताना तिकडे कॅरेबियन भूमीत कर्णधार विराट कोहलीने पहिल्या कसोटीत धूम केली. विराटने 200 धावांची खेळी केली आणि त्याबळावर टीम इंडियाने विंडीजविरुद्ध दुसर्या दिवशी उपाहारापर्यंत 5 बाद 404 अशी ‘विराट’ मजल मारली. फिरकीपटू अश्विनने फलंदाजीतही चमक दाखवत शतक साजरे केले. शेवटी चहापानानंतर भारताने 566 धावांवर डाव घोषित केला. यावेळी भारताचे 7 गडी बाद झाले होते.
विराटने कारकिर्दीतील 12 वे आणि विंडीजविरुद्ध पहिले शतक पहिल्याच दिवशी साजरे केले होते. त्यानंतर आज विक्रमी द्विशतक ठोकले. आपल्या शानदार खेळीदरम्यान त्याने शिखर धवनसमवेत (84) तिसर्या विकेटसाठीही शतकी भागीदारी रचली. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा विराट 143 तर अश्विन 22 धावांवर नाबाद होता व टीम इंडियाने 4 बाद 302 पर्यंत मजल मारली होती. शुक्रवारी सकाळच्या सत्रात या जोडीने आपले वर्चस्व कायम राखत उपाहारापर्यंत 168 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला चारशेचा टप्पा पार करून दिला. उपाहारापूर्वी, चेसच्या गोलंदाजीवर 1 धाव घेत विराटने कारकिर्दीतील पहिलेच द्विशतक साजरे केले. उपाहारानंतर पहिल्या षटकांत गॅब्रियलने विराटची दांडी उडवून ही मॅरेथॉन खेळी संपुष्टात आणली.
अन् विराट आला…
पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजारा बाद झाल्यावर विराटने मैदानात पाऊल ठेवले आणि टीम इंडियाचे वर्चस्व निर्माण करून दिले. टी-20 त तुफानी धुलाई करणार्या विराटने नजाकतीने फटकेबाजी केली. धवनसमवेत तिसर्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. चहापानापूर्वी शेवटच्या षटकात बिशूने धवनला पायचित करून ही जोडी फोडली. 147 चेंडूंच्या खेळीत धवनने 9 चौकार व एक षटकार खेचला. त्यानंतर विराटने अजिंक्यच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 12 षटकातच 57 धावांची भागीदारी केली.
61 व्या षटकात टीम इंडियाचे द्विशतक फलकावर लागले. यादरम्यान विराटने नेत्रसुखद कव्हर ड्राईव्ह आणि ऑन ड्राईव्हचे फटके मारले. बिशूने आपली तिसरी विकेट अजिंक्यच्या रुपात घेतली. पुल शॉट मारण्याचा नादात अजिंक्य साफ चुकला आणि ब्राव्होने मिडविकेटला सोपा झेल घेतला. यानंतर विराटला अश्विनने चांगली साथ दिली. खेळ संपेतर्यंत शेवटच्या 22 षटकात दोघांनी 66 धावांची भागीदारी केली व टीम इंडियाला तीनशेचा टप्पा पार करून दिलाच; पण विंडीजला पाचवी विकेटही मिळू दिली नाही.
कर्णधार म्हणून त्याने विदेशात सात कसोटी खेळल्या असून 76.27 च्या सरासरीने 839 धावा ठोकल्या आहेत. त्यात पाच शतके व एका अर्धशतकाचा समावेश आहे. विदेशातील कर्णधारांच्या सरासरीत विराटपेक्षा फक्त महान फलंदाज डॉन ब्रॅडमन पुढे आहेत. ब्रॅडमन यांनी 15 डावात 942 धावा 85.63 च्या सरासरीने केल्या होत्या.