दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळणार नाही. ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
याबाबत निवेदन करताना रावते म्हणाले की, हेल्मेटची सक्ती राज्यात पूर्वीपासूनच आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. जर हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल मिळणार नाही. राज्य सरकारने त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
पोलिसांवरही कारवाई
त्यावर अजित पवार यांनी जनतेवर हेल्मेटची सक्ती केली जाते; पण पोलीस अधिकारी व कर्मचारीच हेल्मेट वापरत नाहीत त्यांच्यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना रावते यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी हेल्मेट वापरावे, यासाठी संबंधित पोलीस प्रमुखांना सूचना देण्यात येतील. मात्र, जे पोलीस हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत, असे स्पष्ट केले.