प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावरून घसरलेली माथेरानची मिनी ट्रेन सेवा दोन महिन्यांनंतरही रुळावर आलेली नाही. विशेष म्हणजे अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा सुरू करण्यातही रेल्वे प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे माथेरानकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. माथेरान येथून नेरळ येथे जात असलेल्या मिनी ट्रेनचे प्रवासी डब्बे एकाच आठवडय़ात दोन वेळा रुळावरून घसरले. त्यानंतर लगेच प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण पुढे करत नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा ९ मे रोजी बंद करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे माथेरानमध्ये तीव्र पडसाद उमटले. तर माथेरानच्या पर्यटकांनी रेल्वे बंद करण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. स्थानिकांचे शिष्ट मंडळ तीन ते चार वेळा रेल्वेमंत्र्यांना भेटले. सुरुवातीला मुंबई आणि नंतर दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांना माथेरानची रेल्वे सेवा सुरू करण्याबाबात साकडे घालण्यात आले. कुठल्याही परिस्थीतीत ही रेल्वेसेवा कायमस्वरूपी बंद केली जाणार नाही. अशी ग्वाही सुरेश प्रभु यांनी या वेळी दिली. रेल्वे मार्गाची दुरुस्ती पूर्ण होत नाही तोवर अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. मात्र रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशानंतरही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली नाही. यामुळे पर्यटकांबरोबरच स्थानिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. माथेरानची रेल्वे ही माथेरानकरांसाठी अस्मितेचे प्रतीक आहे. ती इथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. माथेरानच्या अर्थकारणात या रेल्वेचा महत्त्वाचा वाटा आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करण्याचे रेल्वे हे प्रमुख साधन आहे. त्यामुळेच माथेरानची जीवनवाहिनी अशी या रेल्वेची ओळख आहे. त्यामुळे रेल्वे सेवा तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. ‘अत्याधुनिक प्रणालीसह मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू केली जाईल. यात एअर ब्रेक प्रणाली, तीन नवीन इंजीन आणि दहा प्रवासी डब्यांचा समावेष असेल असे जाहीर करण्यात आले होते. पण रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अद्याप कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. रेल्वे प्रशासन याबाबत कमालीचे उदासीन आहे.