ठाणे पोलिसांनी उघड केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या इफ्रेडीन प्रकरणात मला नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला होता. याबाबत बोलताना ठाणे पोलिसांनी तिचे हे आरोप फेटाळून लावले असून ममताविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचे सांगितले आहे. शिवाय केनिया आणि भारतात आरोपींच्या हस्तांतरणाचा करार नसला, तरीही ममता, विकी गोस्वामी आणि परदेशात असलेल्या इतर सर्व आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी बोलताना सांगितले आहे.
सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्सेस कंपनीत हजारो कोटी रुपयांचे इफ्रेडीन तयार करून ते गुजरातमाग्रे केनियाला नेले जाणार होते. त्यापासून तिथे डॉ. अब्दुल्ला याच्या कंपनीत मेथ अँफाटामाइन नावाचा अमली पदार्थ तयार करून त्याची जगभरात तस्करी करण्याचा ड्रग्जमाफिया विकी गोस्वामी याचा कट होता. मात्र तो पूर्णत्वाला जाण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी हे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त केले. यात एव्हॉन कंपनीच्या संचालकांसह एकूण १० जणांना अटक करण्यात आली असून ८ जण फरार आहेत. या फरार आरोपींमध्ये ड्रग्जमाफिया विकी गोस्वामी आणि त्याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णीचाही समावेश आहे. हा तस्करीचा कट रचण्यासाठी झालेल्या बैठकांना ममता प्रत्यक्ष हजर होती, तसेच एव्हॉन आणि डॉ. अब्दुल्ला याच्या कंपनीत ती संचालक होणार होती, याचे पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याचे एसीपी शेळके म्हणाले. त्यामुळेच तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र नुकतीच तिने मुलाखत देत त्यात ठाणे पोलीस आपल्याला नाहक गोवण्याचा प्रयत्न करत आहेत, आपला आणि विकी गोस्वामीचा काही संबंध नाही, असे म्हटले होते. मी अध्यात्माच्या मार्गाकडे वळली असून लवकरच खरे खोटे समोर येईल, असेही तिने सांगितले होते. या सगळ्यानंतर पोलिसांनी मात्र तिचे आरोप फेटाळले असून तिच्याविरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याचे सांगितले आहे. ममताने केलेले आरोप म्हणजे केवळ नौटंकी असल्याचे एसीपी शेळके बोलताना म्हणाले आहेत. त्यामुळे ममताचा सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न फसला आहे.