दादर पूर्व येथील आंबेडकर भवनाची इमारत पाडून पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर शिवसेनेला जाग आली आहे. आंबेडकर भवनाच्या इमारतीचे बांधकाम रातोरात पाडल्याने तीव्र संताप आंबेडकरी जनतेकडून केला व्यक्त केला जात आहे. या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. महापौरांसह शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गो-हे यांनी मंगळवारी आंबेडकर भवनाच्या इमारतीची पाहणी केली.
या इमारतीच्या १७ मजली पुनर्बांधणीला महापालिकेने कोणत्याही प्रकारची परवानगीच दिली नसल्याचा खुलासा करत या बांधकामाला महापालिकेने स्थगिती देण्याचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव व ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे आदींनी आंबेडकर भवनाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचीही भेट घेतली. आंबेडकर भवनाबाबत राज्य सरकारने लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणीच शिवसेनेने केली आहे. येत्या अधिवेशनात आंबेडकर भवनासंदर्भात लक्षवेधी मांडणार असून ही भेट देण्यामागे कुठलेही राजकारण नसल्याचे गो-हे यांनी स्पष्ट केले.
याबाबत येत्या १९ जुलैला विधान भवनावर मोर्चा काढणार असल्याचेही बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.