मुख्यमंत्र्यांनी ज्या पिंपरीबुटी गावात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती, त्याच शेतकऱ्याच्या पत्नीनेही विष पिऊन आत्महत्या केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याच महिलेचं सांत्वन करुन हा जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली होती.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृत शांता ताजणे यांना विंधन विहीर मंजूर करण्यात आली होती. यासाठी 70 हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात जमा झाले होते, मात्र संकटकाळात 50 टक्के रक्कमच काढता येते याची त्यांना जाणीव नव्हती. पैशांची चणचण आणि बँक खात्यातील पैसे वटवता न आल्याने शांता ताजणे यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला.
नापिकीला कंटाळून शांता ताजणे या महिलेच्या पतीने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर 3 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी शांता ताजणे आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वनही केलं होतं.
यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शांता ताजणे यांनी आत्महत्या केल्याने यवतमाळ जिल्हा आत्महत्यामुक्त होणार का असा प्रश्न पडला आहे.

