शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने महापालिकेत आपली कामगार संघटना स्थापन केली असली तरी ही संघटना मान्यताप्राप्त म्युनिसिपल कामगार सेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पालिका रुग्णालयांतील परिचारिकांच्या (नर्स) ‘डय़ुटी पॅटर्न’ बदलण्यावरून प्रशासनाने परस्पर निर्णय घेत मान्यताप्राप्त शिवसेनाप्रणीत कामगार सेनेला बाजूला केले.
भाजपाप्रणीत हिंदुस्थान मजदूर संघटनेच्या पदाधिका-यांशी बोलूनच अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिचारिकांना सलग दोन दिवस रात्रपाळी केल्यांनतर मिळणा-या सुट्टीपासून मुकावे लागणार आहे. या निर्णयामुळे शिवसेनेचा चांगलाच तीळपापड झाला आहे.
मुंबईतील महापालिकेच्या केईएम, शीव व नायर या प्रमुख रुग्णालयांसह १७ उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालयांमधील परिचारिकांची सेवा ही पूर्वी ३ रुग्णांमागे एक अशाप्रकारची होती. परंतु आता ५० ते ६० रुग्णांमागे एकेक परिचारिकांना सेवा बजावावी लागत आहे. त्यामुळे या परिचारिकांवर कामाचा ताण येत आहे.
यापूर्वी मान्यताप्राप्त म्युनिसिपल कामगार सेनेच्या पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत परिचारिकांचा डय़ुटी पॅटर्न ठरवण्यात आला होता. यात सलग दोन दिवस रात्रपाळी करणा-या परिचारिकांना एक दिवस आड पुन्हा रात्रपाळी दिली जायची. मधल्या दिवसांत अन्य परिचारिकांना रात्रपाळीची सेवा दिली जायची.
त्यामुळे सर्व परिचारिकांना चांगल्याप्रकारे सेवा बजावता येत होती. हे डय़ुटी पॅटर्न केवळ परिचारिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना कौटुंबिक सुख मिळावे, यासाठीच ठरवण्यात आले होते. याबाबत कोणतीही तक्रार नसताना परिचारिकांचे प्रश्न जोडून ‘डय़ुटी पॅटर्न’ बदलण्यात आले आहे, असा गौप्यस्फोट सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केला.
हे पॅटर्न बदलताना मान्यताप्राप्त म्युनिसिपल कामगार सेनेच्या पदाधिका-यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा प्रशासनाने केली नाही. मात्र मान्यताप्राप्त नसलेल्या हिंदुस्थान मजदूर संघटनेशी चर्चा करून १४ जून २०१६ रोजी हे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे परिचारिकांत कमालीचा असंतोष पसरला आहे.
हिंदुस्थान मजदूर संघटना ही भाजपाप्रणीत असून आमदार पराग अळवणी या संघटनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनेला न विचारता परस्पर भाजपाप्रणीत कामगार संघटनेशी बोलून घेतल्यानंतरही शिवसेनेची कामगार संघटना मूग गिळून गप्प आहे. अखेर सभागृहनेत्यांना पुढे करून याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न
करत आहे.
महापालिका प्रशासनाने यापूर्वीच म्युनिसिपल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांना महापालिका रुग्णालयांच्या हद्दीत प्रवेशबंदी करत त्यांना हद्दपार केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडे बाजू मांडणारे नेतेच नसून त्यांच्याकडील सदस्यही आता भाजपाच्या संघटनेकडे वळत आहेत.