ठाण्यातील पारसिक बोगद्याजवळ मध्य रेल्वेच्या लोकलची कपलिंग तुटल्यामुळे रविवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा फटका विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता (नेट) परीक्षा देणा-या अनेक विद्यार्थ्यांना बसला.
मुंबईबाहेरून मुंबईतील परीक्षा केंद्रावर येणारे अनेक विद्यार्थी नेट परीक्षेला उशिरा पोहोचल्याने त्यांना परीक्षेला बसता आले नाही. तर अनेक परीक्षा केंद्रांवर काही मिनिटांच्या अंतराने आलेल्या विद्यार्थ्यांनाही सीबीएसईच्या परीक्षा केंद्रात पेपरला बसू न दिल्याने ठिकठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले.
विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा मागील वर्षापासून विविध राज्यांतील विद्यापीठांऐवजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेतली जात आहे. नेमके किती विद्यार्थी परीक्षेला मुकले यासंदर्भात सीबीएसईच्या अधिका-यांशी यासंदर्भात अनेकदा संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
मध्य रेल्वेची वाहतूक अगदी वेळेतच विस्कळीत झाल्याने नेटच्या परीक्षेसाठी मुंबई आणि परिसरात येणारे असंख्य विद्यार्थी अणुशक्तीनगर, बोरिवली आणि नवी मुंबईतील काही परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचल्याचे समोर आले आहे. अणुशक्तीनगर इथे परीक्षा केंद्रावर पाच ते दहा मिनिटे उशिरा पोहोचलेल्या ज्योती तिवारी आणि किरण तिवारी या जुळ्या बहिणींसोबतच अमोल बच्छाव आदींना परीक्षेला बसू दिले नाही.
येथे परीक्षेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी उषा बाबर या परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना अर्वाच्य भाषेत बोलल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. तर मुलींना परीक्षा होती, तर रात्री का येऊन इथे थांबला नाहीत, अशा प्रकारे वक्तव्य करून विद्यार्थ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
तसेच माध्यमाच्या एका प्रतिनिधीचे ओळखपत्र हिसकावून घेण्यापर्यंत बाबर यांनी मजल मारल्याचेही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. या सर्व प्रकरणी परीक्षार्थी ज्योती आणि किरण तिवारी या पेशाने वकील असून, आपण या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना परीक्षास्थळी सोडले नसल्याचे ज्योती तिवारी म्हणाल्या.