चेंबूरमधील गडकरी मार्गावर मंगळवारी सकाळी पेट्रोल टँकरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला. या स्फोटात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटाचे वृत्त कळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चेंबूर येथील गडकरी मार्गावरील ओम साई गॅरेजमध्ये एका रिकाम्या टँकरवर वेल्डिंगचे काम सुरु होते. गॅरेजच्या जवळून जाणाऱ्या उच्च दबावाच्या वायरचा संपर्क झाल्याने स्फोट झाला. या स्फोटात वेल्डिंगचे काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. तर गॅरेजमधील एक कामगार जखमी झाला. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.