मुंबईत जोरदार पाऊस

मुंबईत जोरदार पाऊस

पावसाने गुरुवारी रात्री दमदार एन्ट्री करत मुंबईकरांना भिजवून टाकले असून या पावसाने मुंबई व उपनगराला चांगलेच झोडपून काढले. तर शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार कोसळणा-या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील अनेक चाकरमान्यांनी कार्यालयाला दांडी मारली. मुंबईच्या अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. वांद्रे ते दहीसर, कुर्ला ते ठाणे आणि वसई, पालघर या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला.

गेल्या २४ तासात मुंबई शहरात सरासरी २५.४८ मिमी, पूर्व उपनगरात ११.३७ मिमी आणि पश्चिम उपनगरात ३४.६७ मिमी पाऊस झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. तर येत्या ४८ तासात मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

अंधेरीसह काही ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. पावसाचे आगमन होताच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडू लागली आहे. सकाळी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्या उशीराने धावत होत्या.

मुंबईत गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. दादर, अंधेरी परिसरात मुंबईकरांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. तर, अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे वाहने बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडीलाही मुंबईकरांना तोंड द्यावे लागले. मुंबईतल्या पश्चिम उपनगरात आणि कुर्ला, चेंबुर भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रात्री उशीरा घरी परतणा-या मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली.

तर शुक्रवारी पहाटेपासूनच कोसळणा-या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सुखावले आहेत. उकाडयाने हैराण झालेल्या प्रत्येकाच्या मनात पाऊस कधी एकदा पडतोय असे झाले होते. शेवटी एकदाचा पाऊस पडला आणि सगळ्यांनी निश्वास सोडला. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद सगळ्यांनीच घेतला. अनेकांनी आज पावसाचे निमित्त पुढे करुन दांडी मारल्याने अनेक कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी आहे.

दरम्यान, येत्या ४८ तासांत मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *