सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारी घरे देण्यासाठी राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणा-या घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीत जास्तीत जास्त घरे मराठी माणसांना मिळण्यासाठी इतर घटकांप्रमाणेच काही घरे मराठी माणसांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
राज्य सरकारने ‘म्हाडा’ प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधण्यात येणा-या ९७२ घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीत विविध उत्पन्न गटांसाठी घरे आरक्षित आहेत. मात्र मुंबईतील मराठी माणसांना घरांची आवश्यकता जास्त आहे. हक्काचे घर नसल्यामुळे मुंबईतील मराठी माणूस शहरापासून दूर जाऊ लागला आहे.
त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाचा टक्का दिवसेंदिवस कमीच होत आहे. शहरात होणा-या उंच उंच टॉवरमध्ये मराठी माणूस आपले हक्काचे घर विकत घेऊ शकत नाही. तेव्हा सरकारला मराठी माणसांप्रती प्रेम आणि जिव्हाळा असेल, तर लॉटरीत मराठी माणसांसाठी काही घरे राखीव ठेवावीत.
त्याबाबतचा निर्णय राज्य सरकाने घ्यावा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे केली आहे.
