मुंबईकरांना महिनाभर पुरेल इतकेच पाणी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम एक महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबल्यामुळे पालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या प्रचंड उष्णतेमुळे तलावांतील पाण्याचे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन होत असून पाऊस येईपर्यंत तलावांतील शिल्लक साठय़ाचा मुंबईकरांना जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणामध्ये गुरुवारी सकाळी ६च्या सुमारास घेतलेल्या नोंदीनुसार १,१२,४३२ दशलक्ष लिटर इतका जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये १,८९,०६० दशलक्ष लिटर इतके पाणी होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये तब्बल ७६,५२८ दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. सध्या मुंबईकरांना जेमतेम महिनाभर पाणीपुरवठा करता येईल इतके पाणी तलावांमध्ये आहे. सध्या प्रचंड उष्णता असल्यामुळे तलावांतील पाण्याचे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. उष्णतेमुळे तलावातील पाणी नेमके किती आटते याचा अंदाज घेणे अवघड आहे. त्यातच मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाची गैरहजेरी चिंतेची बाब बनली आहे, असे जल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईकरांना दररोज ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र तलावांतील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन गेल्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत २० टक्के पाणीकपात करण्यात आली. दोन दिवसांत मुसळधार! मुंबई : गेले काही दिवस केवळ हुलकावणी देणारा बहुप्रतीक्षित मोसमी पाऊस रविवारी संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावणार असल्याची सुवार्ता आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळने दिला आहे. या स्थितीसाठी आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या पावसामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्र, ओडिसा, झारखंड व बिहापर्यंत मोसमी पावसाचे आगमन जाहीर होण्याचा अंदाज आहे. दोन वर्षांचा दुष्काळ आणि त्यानंतर विलंबाने येत असलेल्या पावसामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, आता राज्यात पाऊस येण्यासाठी हवामानाची स्थिती अनुकूल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *