भूखंड परत देण्याची महाजनांची तयारी!

एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ भूखंड घोटाळ्यात अडकलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी, शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यास आपल्या नावावरची पाच एकरची जागा परत करण्यास आपण तयार आहोत, अन्य संचालकांची भूमिका मला माहीत नाही, असा पवित्रा गुरुवारी घेतला. ही जागा माझ्या नावावर असली तरी पैसे मी दिलेले नाहीत, जागा सक्तीने घेतलेली नाही, योग्य ती किंमत दिली गेली आहे, असे दावे महाजन यांनी बुधवारी केले होते. त्यामुळे भूखंड परत करण्याच्या त्यांच्या पवित्र्यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचवेळी साखर कारखान्याच्या नावावर घेतलेल्या भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील या जागेवर फळबागा लावण्याचे काम जोरात सुरू असल्याचा दावाही मूळ जमीनमालकांनी केला असून हे भूखंड परत मिळावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. २००१ मध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे, गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, गुरूमुख जगवानी या आमदारांसह इतरांनी ‘तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना’ उभारण्यासाठी मानपूर येथील एकूण ८१ एकर जमीन खरेदी केली होती. त्यापैकी ६० ते ६५ टक्के जमीन खडसे, त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक यांच्या नावे आहे. उर्वरित जमीन इतर संचालकांच्या नावे आहे. साखर कारखाना व इथेनॉल प्रकल्प उभारणीचे कारण दाखवून ही जमीन खरेदी करण्यात आली होती. जमिनीचा चांगला मोबदला आणि मुलांना नोकरीचेही आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या जमिनीवर कोणताच कारखाना किंवा प्रकल्प उभा राहिला नाही. या ठिकाणी कारखान्यासाठी दोन वेळा भूमिपूजन होऊनही पुढे काहीच झाले नाही. सद्यस्थितीत या जागेभोवती कुंपण घालून शेततळे, अंतर्गत रस्ता, विहीरीचे काम तसेच ८१ एकर जागेवर फळबाग लावण्याचे काम सुरू आहे. आधुनिक यंत्रणेद्वारे रात्रंदिवस सपाटीकरण सुरू आहे. तीन किलोमीटरवरील तलावातून पाणी आणण्यात आले आहे. परिसरात एका खासगी कंपनीचे मजूर काम करत असून फळबाग तयार करण्याचे कंत्राट कंपनीस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली असल्याचे शेतकरी अजय पाटील यांनी सांगितले. अजय पाटील यांचे वडील शंकर दगडू पाटील यांच्या नावावर गट क्रमांक १७ मध्ये सात एकर जमीन होती. ही जमीन सध्या साखर कारखान्याच्या नावावर आहे. महाजन यांच्या नावावरील जागा अल्पभूधारक सुपडू जंगलू तायडे आणि गोविंदा जंगलू तायडे या दोघांच्या नावे ५० टक्के तसेच भास्कर सुका तायडे, राजाराम सुका तायडे, बाजीराव सुका तायडे या तिघांच्या नावे ५० टक्के अशी विभागून आहे. आरोप तथ्यहीन जलसंपदा मंत्र्यांनी जमीन हडपली, हा आपल्यावरील आरोप तथ्यहीन आहे. केवळ संचालक मंडळात असल्याने ती जमीन माझ्या नावावर आहे. बाकी त्या जमिनीशी आपला काही संबंध नाही, असा पुनरूच्चार गिरीश महाजन यांनी नाशिक येथे केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *