सावधान, अति गरम कॉफीमुळे कर्करोग शक्‍य…

थकवा जाणवला, कंटाळा आला किंवा अगदी मित्र-मैत्रिणींची मैफल जमली की चहा- कॉफीपान ओघाने येतेच. पण, आता कॉफी व अन्य गरम पेये अति गरम असताना प्यायली तर अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका असतो, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असलेल्या “इंटरनॅशनल फॉर रिसर्च ऑन कॅन्सर‘ (आयएआरसी) या संस्थेने काढला आहे. मात्र सामान्य तापमान असलेल्या कॉफीच्या घुटक्‍यामुळे हा धोका टळू शकतो, असेही सांगितले आहे.
 
65 अंश धोकादायक 
कॉफीपान हे काही प्रकारच्या कर्करोगावर लाभदायक असले तरी 65 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असलेल्या कॉफीचे सेवन केले तर त्यापासून हानी पोचू शकते, असे “आयएआरसी‘ने स्पष्ट केले आहे. यासाठी एक हजार जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून मिळालेल्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर अति गरम कॉफी प्यायली तर कर्करोगाचा धोका उद्‌भवू शकतो, असा निष्कर्ष काढला आहे. कोणते पेय आहे, यापेक्षा ते किती गरम आहे, हे महत्त्वाचे आहे, असे साथीच्या रोगाच्या तज्ज्ञ डॅना लुमिस यांनी सांगितले. या अभ्यासाच्या सर्वेक्षणात त्या सहभागी झाल्या होत्या. 
 
सामान्य तापमान हवे 
गरमागरम कॉफीमुळे कर्करोग होऊ शकतो, हा निष्कर्ष 1991 मध्ये डॅना लुमिस यांनी मांडला होता. कॉफीप्रमाणेच दक्षिण अमेरिकेत लोकप्रिय असलेले व वनौषधींपासून तयार करण्यात येणारे “मेट‘ हे पेय अति गरम असताना सेवन केल्यास कर्करोग होऊ शकतो. याविषयी प्रसिद्ध केलेल्या विज्ञानविषयक लेखांचा विचार “आयएआरसी‘ने याचा अभ्यास करताना केला आहे. कर्करोग टाळण्यासाठी कॉफी सेवन करू नये, असे सांगण्यात आल्यापासून याविषयी सखोल अभ्यास सुरू झाला असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. 65 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा गरम असलेली कॉफी प्यायली तरच अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका असतो, असे संस्थेने म्हटले आहे. मात्र, सामान्य तापमान असलेली कॉफी प्यायल्यास गर्भाशय, फुफ्फुसे व स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. 
 
अभ्यासातील निष्कर्ष 
अति गरम कॉफी सेवनाचा परिणाम तपासण्यासाठी चीन, इराण, तुर्कस्तान व दक्षिण अमेरिकेत पाहणी करण्यात आली. या देशांमध्ये चहा- कॉफी किंवा “मेट‘ हे पेय अति गरम म्हणजे 70 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असताना प्यायले जाते. त्यामुळे अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्‍यता तेथे जास्त असल्याचे दिसून आल्याचे “आयएआरसी‘ने म्हटले आहे. कॉफी हे पेय ऑक्‍सिजनविरोधक (अँटी ऑक्‍सिडंट) म्हणून उपयुक्त असून आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे लक्षात आले. मानवाला कर्करोग होईल अशी फार कमी लक्षणे कॉफीत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. “मेट‘ हे पेय थंड असताना बंद भांड्यामधून स्ट्रॉद्वारे प्यायले जाते. गार “मेट‘चे सेवन केल्यास अन्ननलिकेला बाधा पोचत नाही, असेही अभ्यासात लक्षात आले आहे. गरम पेयांमधील दूध व अन्य पेयांचा कर्करोगाशी संबंध असण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *