लिल्हारे कुटुंब मूळ बालाघाट येथील आहे. रोशनचे आई-वडील बालाघाट येथे राहातात. रोशन व मुनिश गत वर्षभरापूर्वी स्वामीनगर येथील पुरुषोत्तम सायरे यांच्याकडे भाड्याने राहातात. दोघेही सेंट्रिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपूर्वी छन्नूलाल यांनी २० लाख रुपयांमध्ये खापरी येथील घर विकले. या पैशांतून मोटरसायकल घेऊन देण्याचा तगादा रोशन याने मुनिशकडे लावला होता. गरज नसलेल्या कामावर पैसे न खर्च करण्याचे सांगून मुनिशने मोटरसायकल घेण्यास नकार दिला होता. त्याचा रागही रोशनला होता. मंगळवारी मुनिशने भाजी केली. भाजी तिखट झाल्याने रोशनने त्याच्यासोबत वाद घातला. लाकडी राफ्टरने रोशनने मुनिशच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याने घरमालकाला उठविले व मुनिशचा खून झाल्याचे सांगितले. घरमालकाचा मुलगा पंकज सायरे यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली.
विहिरीत फेकणार होता मृतदेह
हत्या केल्यानंतर रोशन हा मुनिश याचा मृतदेह विहिरीत फेकणार होता. परंतु त्याला ते जमले नाही. रोशनने रक्ताने माखलेले कपडे व लाकडी राफ्टर विहिरीत फेकले होते. सुरुवातीला त्याची कोणीतरी हत्या केल्याचे रोशन सांगत होता. तपासादरम्यान रोशन यानेच हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

