भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. सायनाने अंतिम फेरीत सुन यु हिचा ११-२१, २१-१४, २१-१९ असा पराभव केला.
सायनाने तिच्यापेक्षा सरस जागतिक मानांकन असलेल्या वॅंग यीहान हिला उपांत्य लढतीत दोन सामन्यांमध्ये हरवले होते. आता तिने अंतिम फेरीत चीनच्याच सुन यु हिचा पहिला सामना गमावूनही जोरदार कमबॅक करत पराभव केला.
सायनाने पहिला सामना ११-२१ असा गमाविला. त्यानंतर दुस-या सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच आघाडी टीकवत २१-१४ असा खेळ करत दुसरा सामना जिंकला. त्यानंतर तिस-या निर्णायक सामन्यामध्ये सायना आणि सुन यांच्यात चुरस पहायला मिळाली. अखेर सायनाने २१-१९ अशी बाजी मारत विजेतेपद आपल्या नावावर केले.
सायनाने या स्पर्धेचे हे दुसरे विजेतेपद मिळविले आहे. या मौसमातील सायनाचे हे पहिले विजेतेपद आहे. रिओ ऑलिंपिकपूर्वी सायनाने मिळविलेले हे विजेतेपद खूप महत्त्वाचे आहे.