सोनियाजी गरजल्या : दबाव, भीती झुगारून रस्त्यावर उतरा

सोनियाजी गरजल्या : दबाव, भीती झुगारून रस्त्यावर उतरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत देशात दबाव व भीतीचे वातावरण पसरले आहे. हा दबाव व भीती झुगारून रस्त्यावर उतरा, असे आदेश कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना दिले. सोनिया गांधी यांनी कॉँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्री व नेत्यांना मोदी सरकारविरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिले.

मोदींवर तोफ डागताना त्या म्हणाल्या की, मोदी हे चांगल्या प्रशासनाच्या बाता मारत असताना त्यांचे सहकारी जातीयवादी गरळ ओकत आहे. मोदी सरकारचे हे वागणे दुटप्पी असून जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोदी सरकार हे देशातील कल्याणकारी राजवट शिस्तबद्धरीत्या मोडीत काढत आहे. भू-संपादन विधेयक व अन्न सुरक्षा कायद्यात बदल करण्याचे घाटत आहेत. त्यामुळे दोन्ही मुद्दय़ांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध करावा, असे आदेश त्यांनी दिले.

आपण चांगले सरकार चालवत असल्याची आणि घटनात्मक जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असल्याची दवंडी पंतप्रधान मोदी पिटत आहेत तर दुस-या बाजूला त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी बेछूटपणे जातीयवादी विधाने करत आहेत. जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

देशाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा यापूर्वीच मलीन झाली आहे. देशात जाणूनबुजून दबाव व भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. तसेच मोदी सरकारकडून दुटप्पीपणाने काम केले जात आहे. ही बाब देशासाठी अधिक घातक आहे. त्याचबरोबर काँग्रेसने गेल्या १० वर्षात सुरू केलेल्या अनेक सामाजिक योजनांना सुरुंग लावला जात आहे.

यूपीए सरकारने अन्न सुरक्षा कायदा देशातील ६७ टक्के जनतेला लागू केला होता. ते प्रमाण ४० टक्क्यांवर आणण्याचे मोदी सरकार घाटत आहे. तसेच यूपीए सरकारने सुरू केलेल्या किमान आधारभूत किमतीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका गांधी यांनी केली.

शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, ग्रामीण भागातील रस्ते, महिला व बालकल्याण आदी क्षेत्रांच्या निधीत कपात केली आहे, ही बाब अधिक गंभीर आहे. तसेच देशातील सत्तेचे केंद्रीकरण होत आहे. संसदीय परंपरांना तिलांजली दिली जात आहे. न्यायमंडळातही मोदी सरकारच्या काळात धोका निर्माण झाला आहे, असा इशारा गांधी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *