पाकिस्तानातही २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन

पाकिस्तानातही २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन

पाकिस्तानने भारतीय योग प्रशिक्षकांना व्हिसा देण्यास नकार दिला असला तरी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनी तेथे नियोजित वेळेनुसार भातीय दूतावासात योगासने होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, पाकिस्तानने नेमक्या कुठल्या कारणाने ३० भारतीय योग प्रशिक्षकांना व्हिसा नाकारला याची कल्पना नाही. परंतु आम्ही अंतर्गत व्यवस्था केली आहे. तेथील योग प्रशिक्षकांच्या देखरेखीखालीच हा कार्यक्रम होईल. ४७ मुस्लीम देश योगदिन सहप्रायोजकही आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधानांची हजेरी, पण योगासन करणार नाहीत एका प्रश्नाच्या उत्तरात स्वराज यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर होणाऱ्या योग कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परंतु ते योगासने मात्र करणार नाहीत. राजपथावरील कार्यक्रमाचे आयोजन योगगुरू रामदेवबाबा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर स्वत: स्वराज या दिवशी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. याप्रसंगी आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून आणि अध्यक्ष सॅम कुटेसा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

योगदिन कार्यक्रमात सहभागासाठी कुणावरही दबाव आणला जाणार नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना राजपथावरील योगदिन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु यासंदर्भातील त्यांच्या नकारात्मक वक्तव्यावरून ते या कार्यक्रमात सहभागी होतील असे वाटत नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्राचा आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *